अमरावती : अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी सकाळी ८ ते १०.१५ वाजेपर्यत दोन तास जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत मिनीमंत्रालयाचा परिसर स्वच्छ केला.
स्वच्छ भारत मिशनच्या या मोहीमेत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने स्वच्छता श्रमदान करून जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने सदरचे उपक्रम तालुका, गावपातळीवर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सर्व ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता विषयक उपक्रमात सहभाग भाग घेवून आपले गाव व परिसर स्वच्छ ठेवावा तसेच ओला, सुका व न कुजणारा कचरा नेहमी वेगवेगळा कचरापेटीच्या माध्यमातून संकलीत करावा. त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रीय खत तयार करावे व न कुजणारा कचरा रिसायकल करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. मोहीमेचा समारोप स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला. यावेळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.