अमरावती : गत काही दिवसांपासून पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून. त्यात प्रामुख्याने डेंग्यू या आजाराचे रूग्ण वाढले आहेत. सर्व कीटकजन्य आजाराच्या निर्मूलनासाठी फवारणी, सर्वेक्षणाचे काम हिवताप विभागाने सुरू केले आहे. किटकजन्य आजराचे पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून आवश्यक उपचार व औषधसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व शासकीय रूग्णालयांत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांनी दिली. कीटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्याद्वारे ग्रामीण व शहरी भागात आरोग्य केंद्र निहाय, वॉर्डनिहाय सर्वेक्षण होत आहे. महापालिकेच्या क्षेत्रातील बांधकामावरील मजुरांची नोंद करून बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डास अळी आढळल्यास टेमिफॉस कार्यवाही करण्यात येत आहे. ठिकठिकाणी डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरू आहे.
बाॅक्स
अशी घ्या खबरदारी
आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे
घरालगत नाली असल्यास पाणी साचू नये, ते वाहते ठेवणे
वापरात नसलेली भांडी रिकामी करणे
झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे
ताप आल्यास त्वरित दवाखान्यात जाऊन तपासणी व उपचार घेणे
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे
बॉक्स
गृहभेटीव्दारे व जनजागृती
आरोग्य कर्मचा-यांकडून घरातील पाणी साठे तपासणी करून डास अळी आढळल्यास समक्ष भांडी रिकामी करणे, डासअळी घनतेत वाढ झाली असल्यास त्वरित जलद ताप सर्वेक्षण, साठवलेल्या पाणीसाठ्यात टेमिफॉस द्रावण टाकणे, साठविलेले पाणी साठे आठवड्यातून किमान एक वेळा रिकामे करणे, कीटकनाशक पायरेथ्रम दोन टक्के औषधांची फवारणी करणे, विशेषत: डेंग्यू प्रादुर्भाव आढळलेल्या गावात आठवड्यातुन दोनवेळा धूर फवारणी करण्यात येत आहे.
बॉक्स
दीड हजारांवर रक्तजल नमुने तपासले
जिल्ह्यात ऑगस्ट २०२१ पर्यंत १ हजार ६७० संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तजल नमुने तपासले. तपासणीअंती निश्चित रुग्णसंख्या २०१ आढळली आहे.