लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास केले जात नाही. असे असताना जिल्ह्यातील नववी उत्तीर्ण झालेल्या ५२२१ विद्यार्थ्यांनी दहावीचे परीक्षा अर्ज भरले नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कुठे गेले, असा सवाल शिक्षण विभागासमोर उपस्थित झाला आहे. नववी उत्तीर्ण होऊनही दहावीत प्रवेश किंवा परीक्षा न देणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत.गतवर्षी नववीत ४५८४४ विद्यार्थी पटसंख्या होती. यात २३८३० मुले, तर २२०१४ मुलींची संख्या होती. त्यापैकी दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ४०६६३ विद्यार्थी परीक्षेत प्रवेशित होते. नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश केला असताना ५२२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला दिली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले तर नाही, अथवा बाहेरगावी तर गेले नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, पटसंख्येवर दर्शवून विद्यार्थ्यांची आकडेवारी फुगवून दाखविली जाते, असे यातून स्पष्ट होते. त्यामुळेच नववीतील विद्यार्थ्यांनी दहावीत प्रवेश वा परीक्षा दिली नाही, हे पुढे आले.
पटसंख्येचा घोळशाळेच्या पटसंख्येवर विद्यार्थी कमी दिसू नये, यासाठी पहिलीपासूनच आकडेवारी फुगवून दर्शविली जाते. त्यामुळे पहिली ते नववीपर्यंत विद्यार्थी संख्या कायम दिसते.काही विद्यार्थी शाळा सोडून गेल्यानंतरही ते पटसंख्येवर कायम असतात. शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असतो.विशेषत: शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्येवर नसताना तो विद्यार्थी प्रवेशित असल्याचा हा प्रकार नित्याचीच बाब झाली आहे.
बालविवाह, आर्थिक चणचण, स्थलांतर - नववीनंतर पुढे शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही कुटुंबांत आर्थिक चणचण जाणवत असल्याने रोजगाराच्या शोधासाठी विद्यार्थी शिक्षण सोडतात.- काही आई-वडील मुलगी दहाव्या वर्गात पोहोचली की, १५ व्या वर्षीच विवाह करून मोकळे होतात. हा बालविवाह असतानासुद्धा समाजात यासंदर्भात दखल घेतली जात नाही. विशेषत: दुर्गम, आदिवासी भागात असा प्रकार अधिक जाणवतो.- मजूर कुटुंब स्थलांतरित होते. त्यामुळे नववीनंतर दहावीत प्रवेश न घेता रोजगाराकडे विद्यार्थी वळतात, त्यामुळे पुढील शिक्षणाला ब्रेक लागतो.