दोन बैलबंड्या जप्त, नावेड येथील प्रकार
वाठोडा शुक्लेश्वर : भातकुली तालुक्यातील नावेड येथून अवैधरीत्या वाळूची तस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक सरपंच आणि उपसरपंचांना मिळताच त्यांनी दोन बैलबंडी पकडून पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केली. या धाडसाबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी वाळूमाफियांवर ‘सर्जिकल स्ट्राइ“ झाल्याची गावात चर्चा आहे.
वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वत:ची यंत्रणाही तयार केली. टेकड्या व नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा करायचा. काही काळ ही वाळू साठवायची नंतर आतिरिक्त दराने वाळूची विक्री करून अमाप पैसे मिळवायचे, असा धंदा सध्या जोरात सुरू आहेत. त्यामुळे शासनाचा महसूलही बुडत आहे.
दरम्यान, बैलबंडीच्या साह्याने नदीपात्रातून तसेच ई-क्लास जमिनीतून अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत असल्याची माहिती उपसरपंच दीपक नागे यांना मिळताच लगेच त्यांनी यासंदर्भात खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत यांना माहिती दिली. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या बैलबंडीचालकांवर कारवाई करून दोन बैलबंड्या जप्त केल्या आणि पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या. यावेळी सरपंच संगीता धंदर, पोलीस कर्मचारी अंबादास पडघमोळ, ललित खेडकर, प्रभारी तलाठी संजय पवार हे उपस्थित होते.
--------------