चांदुरबाजारची घटना : आरोपीविरुध्द गुन्हा दाखल अमरावती : गेल्या दोन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्या युवकाला चांदूरबाजार येथील नागरिकांनी चांगलेच बदडले. ही घटना सोमवारी चांदूरबाजार येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुध्द विनयभंग व बाल लैगिक अत्याचार कायदा (पोस्को) दाखल केला आला आहे. अब्दुल जाकीर अब्दुल रहीम (३०) रा. चांदूरबाजार असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी ही १४ वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनी असून ती तालुक्यातील एका गावातून चांदूरबाजार येथे शिक्षणासाठी येत होती. तिला सदर आरोपी नेहमीच चिडीमारी करायचा व तिचा पाठलाग करायचा. त्यामुळे ती नेहमी त्रस्त राहायची. तिने बरेच वेळा या प्रकाराला विरोधही केला होता. परंतु आरोपीने त्याचे कारनामे सुरुच ठेवले. त्यामुळे घटनेच्या दिवशी पुन्हा आरोपीने तिचा पाठलाग करुन तिचा हात पकडून विनयभंग केला .घाबरलेल्या मुलीने रडत जाऊन चौकात उभे असलेल्या आॅटोचालकांना याबाबत हकिकत सांगितली. आॅटोचालकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अल्पवयीन मुलीच्या बयानावरुन व तिच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कठोडी सुनावली आहे. चांदुरबाजारात अल्पवयीन विद्यार्थिनींना छेडणारी टोळी सक्रिय झाली असून पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. समाजात बदनामी होईल या भीतीपोटी अनेक मुली तक्रार द्यायला समोर येत नाही. या घटननंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे टवाळखोऱ्यांना लगाम बसणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थिनीची छेडखानी करणाऱ्याला बदडले
By admin | Updated: April 14, 2016 00:14 IST