यशेामती ठाकूर, पालकमंत्र्यांकडून दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाचे सांत्वन
अमरावती : दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण खंबीरपणे चव्हाण कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी मोरगाव येथे सांगितले.
महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोरगाव येथे दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबाला भेट दिली व त्यांचे सांत्वन करून दिलासा दिला.
कुटुंबातील व्यक्ती जाण्याने होणारी हानी कधीही भरून निघत नाही. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दीपालीसारखी एक कर्तबगार अधिकारी आपल्यातून निघून गेली. या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी एक कुटुंबीय म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दीपाली यांचे पती राजेश मोहिते, सासू, दीर व नातेवाईक यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री यांनी दीपाली चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी जबाबदार व्यक्तींना कठोर शिक्षा होण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करू. यापुढे असे प्रकार घडू नये, यासाठी विशाखा समिती तत्काळ कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. मेळघाटात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले.