अमरावती : महापालिकेद्वारा शहरात गणेश विर्सजनासाठी १६ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. श्रद्धापूर्वक विर्सजन केलेल्या मूर्तीची माती इतरत्र न टाकता कुंड्यांमध्ये व बगीचांमध्ये साठवण करून त्यामध्ये फुलझाडे लावण्यात येणार आहेत. आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढाकारात यंत्रणा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
गणपती विसर्जन दरम्यान नागरिक घराजवळ विसर्जन करत होते व सोबतच नदी-नाले प्रदूषित होऊ नये, कुठलीही अनुचित घटना होऊ नये व नागरिकांची सोय व्हावी, यादृष्टीने या तलावाची निर्मिती करण्यात आली होती. या अनुषंगाणे एक अभिनव प्रयोग यावर्षी महानगरपालिका राबवित आहे. विसर्जनानंतर अत्यंत सुपीक अशी माती कुंड्यांमध्ये साठवून त्यामध्ये फुलझाडांची लागवड करण्यात येणार आहे. हा उपक्रम सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या संकल्पनेतून उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, धनीराम कलोसे यांची व स्वास्थ्य निरीक्षकांची टीम यांच्या परिश्रमातून तयार करण्यात आलेला आहे.