फोटो -
चांदूर रेल्वे : तालुक्यातील तरोडा गावात बालविवाह नियोजित वेळेच्या अवघ्या १० मिनिटांआधी थांबविण्यात आला. अमरावतीच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही कार्यवाही केली.
सोमवारी सकाळी १० वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील तरोडा या गावी होत असल्याची माहिती वर्धा येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी अमरावतीचे बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना दिली. डबले यांनी तात्काळ दखल घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करून चांदूर रेल्वेच्या ठाणेदारांना माहिती दिली. डबले यांनी तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह विवाह स्थळ गाठले. या अंतरपाटाची तयारी सुरू होती.
अजय डबले यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका यांना विवाहाच्या ठिकाणी बोलावले. बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अन्यथा तो बालविवाह ठरतो, अशी माहिती त्यांनी दिली व वधू-वर, नातेवाईक, ग्रामस्थ यांची समजूत काढली. बालविवाहाला स्थगिती देऊन वधू-वर, नातेवाईक यांना बाल कल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली व सर्वांना सोबत घेऊन अमरावती येथील बाल कल्याण समितीपुढे हजर करण्यात आले.
बाल कल्याण समिती सदस्य मीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्यासमक्ष वधू-वर, नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांच्याकडून जबाब वजा हमीपत्र लिहून घेण्यात आले. सदर बालिकेला दर १५ दिवसांनी बाल कल्याण समितीसमक्ष हजर करावे, असा आदेश याप्रसंगी देण्यात आला.
--------