लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन नामांकित कंपनीच्या 'एक्सपायर' झालेल्या सिमेंटची त्याच कंपनीच्या बॅगमध्ये रिफिलिंग करून त्याच्या विक्रीच्या अवैध धंद्याचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला. पोलिसांनी मासोद, काटआमला व नवसारीस्थित गोडाऊनमधून त्या निकृष्ट सिमेंटची १४४६ पोती जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांना १ ऑगस्टला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडीअंतर्गत जेल रवाना करण्यात आले. दर्जाहीन सिमेंटच्या रिपॅकिंगचे हे जाळे महाराष्ट्रभर पसरले असून, स्थानिक दोघेजण हे त्यातील 'छोटी कडी' असल्याचे तपासांत समोर आले आहे. शेख शाहरूख शेख रशीद हस्नवाले (वय ३२, रा. राहुलनगर) व अफजल हुसैन कालीवाले (रा. गवळीपुरा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मासोद येथील एका शेतामधील गोडावूनमध्ये पीआय गोरखनाथ जाधव यांच्या टीमने गुरुवारी रात्री छापा टाकला होता. तेथून शेख शाहरूख याला पकडण्यात आले. त्याच्याकडून काटआमला शिवारातील युसूफ (रा. गवळीपुरा, बडनेरा) यांच्या शेतातील गोडाऊन व नवसारी भागातील ईर्शाद कालीवाले याच्या गोडाऊनमधूनही तोच अवैध धंदा सुरू असल्याचे उघड झाले.
यांना विकले ते सिमेंटमुदतबाह्य सिमेंटची नामांकित कंपनीच्या बॅगेत रिपॅकिंग करून ते शहरातील तीन दुकानदार, एक अभियंता व एका ठेकेदाराला विकत असल्याचे प्राथमिक तपासांत समोर आले आहे. बाजारभावापेक्षा ३० ते ५० रुपये कमी दराने विशिष्ट ग्राहकांनाच मागणीच्या तुलनेत कमी पोती दिली जात होती.
हे केले जप्तमासोद येथे अंदाजे ९०८ बॅग, काटआमला येथे ४०० बॅग, नवसारी येथे १३८ बॅग अशा एकूण १४४६ निकृष्ट दर्जाचे सिमेंट भरून रिपॅकिंग केलेल्या बॅग, नामांकित कंपनीच्या रिकाम्या बॅग्स, सिमेंट रिपॅकिंग करण्याकरिता वापरलेले साहित्य, मालवाहू वाहन असा एकूण ११.७१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. त्या रिकाम्या बॅग्स आरोपींनी नागपूर व स्थानिकांकडून विकत घेतल्या होत्या.
"मुदतबाह्य व निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचे रिपॅकिंग करून ते विकण्याचा अवैध धंद्याचे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यांत मोठे रॅकेट आहे. स्थानिक दोघे त्यातील 'छोटी कडी' आहे. आरोपींनी निकृष्ट दर्जाचे ते सिमेंट तूर्तास येथेच विकल्याचे समोर आले आहे."- गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा