दुय्यम निबंधक अडचणीत : सहजिल्हा निबंधकांनी हात झटकलेअचलपूर : मुद्रांक विक्रेत्याबाबत सुरू असलेल्या वादाविषयी सहदुय्यम निबंधकाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अपमानित करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता हा वाद पेटला आहे. दुय्यम निबंधकाला अटक करून निलंबित करावे, यासाठी स्थानिक पत्रकार आक्रमक झाले आहेत.अचलपूर येथील मुद्रांक विक्रेता व दस्तलेखकांनी ८ ते ९ महिन्यांपूर्वी तहसील कायालय परिसरात अवैध बांधकाम करुन शेड उभारले होते. तेथे संगणक आणून त्यावर लोकांची कामे केली जात असल्याने उपासमारीची वेळ आल्याचे निवेदन कार्यालयानजीकच्या झेरॉक्स व संगणकावर कामे करणाऱ्या दुकानदारांनी तहसीलदारांना आठ दिवसांपूर्वी दिले होते. त्याची एक प्रत राज इंगळे व आशीष गवई यांनी देखील देण्यात आली होती. या तक्रारीवर सहदुय्यम निबंधक अर्जुन बडधे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी इंगळे व गवई हे दोघे ११ मार्च रोजी गेले असता त्यांनी या दोघांना अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. येथून या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पत्रकार आणि सहदुय्यम निबंधक बडधे यांच्यात वाद निर्माण झाला. पत्रकारांनी आक्रमक पवित्रा घेऊन बडधे यांना पोलिसांनी अटक करावी व त्यांना नोकरीतून निलंबित करावे, आदी मागण्या त्यांनी लाऊन धरल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी विविध वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी निवासी जिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपायुक्त रमेश मावस्कर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार अचलपूर-परतवाडा येथील पत्रकारांनी सहदुय्यम निबंधक कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या लोकांना ताटकळत उभे रहावे लागत असल्याने या कार्यालयासमोर स्वखर्चाने सिमेंटच्या बेंचची व्यवस्था करून दिली होती. असे असतानाही अर्जुन बडधे यांनी दोन पत्रकारांना तुच्छतेची वागणूक दिली. पोलिसांनी बडधे यांना अटक करून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या खरेदी-विक्रीची चौकशी करावी, बडधे नोकरीवर लागल्यापासून त्यांच्या स्थावर मालमत्तेची व संपत्तीची चौकशी करावी आणि त्यांना तडकाफडकी निलंबित करावे, आदी मागण्या करण्यात आले. या मागण्या पंधरा दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर प्रमोद नैकिले, विलास थोरात, विनय चतुर, प्रकाश गुळसुंदरे, जितेंद्र रोडे, प्रकाश पुसदकर, मो. इर्शाद, फिरोजखान, संजय अग्रवाल, हरीष पुरोहित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हा सहनिबंधक बटुले यांचेशी याबाबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते म्हणाले की, बडधे यांचेबद्दल आजपर्यंत एकही प्रकाशित बातमी वाचलेली नाही. त्यांच्याबद्दलच्या तक्रारींची मला माहीती नाही. बटुले यांनी अशी नरो वा कुंजोरो वा ची भूमिका घेतल्याने येथील पत्रकार चांगलेच संतप्त झाले आहेत. हे प्रकरण आता अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
मुद्रांक विक्रेत्यांचा वाद पेटला
By admin | Updated: March 17, 2016 00:19 IST