फोटो
परतवाडा : एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आगार (डेपो) यांना डिझेलच्या टंचाईने ग्रासले आहे. सोमवारनंतर मंगळवारीदेखील काही डेपोतील डिझेल संपले. याचा फटका परतवाडा, दर्यापूर, मोर्शी, वरूड व बडनेरा आगाराच्या बसफेऱ्यांना बसला.
डिझेलअभावी एसटीच्या अनेक फेऱ्या डेपो व्यवस्थापकांना रद्द कराव्या लागल्या. २५, २६ व २७ डिसेंबरला आलेल्या सलग तीन दिवसाच्या सुट्यांमुळे डिझेल टँकर संबंधित डेपोला पोहोचू शकले नाहीत. यामुळे हा डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सोमवारी परतवाडा डेपोतील डिझेल संपल्यामुळे विविध मार्गांवरील जवळपास शंभर फेऱ्या रद्द झाल्या. यात अमरावती मार्गही प्रभावित झाला होता. ग्रामीण भागासह मेळघाटातही बस धावू शकल्या नाहीत. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत डिझेल टँकर न आल्यामुळे औरंगाबाद, नागपूर, भुसावळकरिता एसटी बस जाऊ शकली नाही. यादरम्यान परतवाडा डेपोतील काही एसटी बसकरिता अमरावती, चांदूर रेल्वे, आकोट येथून डिझेलची उचल करावी लागली.
परतवाडा आगारात एकूण ५४ बस आहेत. त्यांच्याकरवी ५२ मार्गांवर माध्यमातून ३४४ फेऱ्या चालवल्या जातात. याकरिता परतवाडा आगाराला आठवड्यातून डिझलचे तीन टँकर लागतात. दररोज पाच ते साडेपाच हजार लिटर, तर आठवड्याला ३६ हजार लिटर डिझेल यात खर्ची पडते. पण, सोमवारी डेपोतील डिझेलच संपल्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्यात. त्याचा फटका प्रवाशांसह महामंडळाला बसला.