व्यापाऱ्यांना फायदा : सोयाबीन ३,९५०, तूर ८,८५० रुपये क्विंटलअमरावती : खरिपाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांजवळ माल नाही, अशा स्थितीत सोयाबीन व तुरीच्या दरात किंचीतही वाढ झाली. याचा व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. सद्यस्थितीत सोयाबीन ३९०० ते ३९५० रुपयांवर पोहोचले आहे. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हंगामातच माल विकल्याने काही मोजक्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना याचा लाभ होत आहे.यावर्षी खरिपाच्या सर्व पिकांच्या सरासरी उत्पन्नात घट आली आहे. मूग व उडदाचे पीक पावसामुळे उद्ध्वस्त झाले. तीच गत सोयाबीनची झाली. क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने रोग व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीत तेलबिया, कडधान्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र सुरुवातीला तुरीचे भाव वगळता सोयाबीन व इतर कडधान्याचे भाव कोसळले आहे. सुरुवातीला तुरीला १० ते साडेदहा हजारांपर्यंत भाव मिळाला. नंतर दोनच आठवड्यात हे भाव घसरून ७ ते ८ हजारांवर आले. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाली आहे. साधारणपणे ४ ते ५ हजार पोत्यांची आवक होत आहे. मागील आठवड्यात ३३०० ते ३५०० पर्यंत सोयाबीनचे भाव होते. त्यामध्ये आता किंचित वाढ झाली आहे. ३९०० ते ३९५० पर्यंत रुपये क्विंटल पर्यंत भाव पोहचले आहे. पुढे आणखी भाव होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
सोयाबीन, तुरीच्या दरात वाढ
By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST