अमरावती : पोलिसांना हुलकवणी देत दुचाकी घेऊन पळालेल्या दुचाकीस्वाराने सोडलेल्या स्कूल बॅगमधून पोलिसांना २ किलो ७० ग्रॅम गांजा मिळाला. २० जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीचा तो गांजा जप्त केला असला तरी गांजा तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागू शकला नाही.
नागपुरी गेट पोलिसांचे पथक २० जुलै रोजी रात्रीदरम्यान ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीस्वाराला संशयावरून थांबविले. खांद्यावर काळ्या रंगाची स्कूल बॅग घेऊन तो तरुण जमील कॉलनी चौकाकडून ट्रान्सपोर्टनगरकडे जाताना दिसला. त्याने त्याचे नाव मोहम्मद शारिक मोहम्मद शाकीर (२४, रा. परतवाडा) असे सांगितले. पोलिस यंत्रणा त्याच्या काळया रंगाची बॅगची पाहणी करत असताना तो बॅग सोडून दुचाकी घेऊन पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र तो मिळून आला नाही. दरम्यान, त्याच्या बॅगची पाहणी केली असत आत खाकी रंगाचे दोन आढळून आले. त्यात २ किलो ७० ग्रॅम गांजा मिळून आला. त्याच्याविरुद्ध नागपुरी गेट पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाईपोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी गेटचे ठाणेदार हनमंत उरलागोंडावार, पोलिस निरीक्षक जनार्धन साळुखे, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली चव्हाण, उपनिरीक्षक गजानन विधाते, एएसआय अहेमद अली, अंमलदार संतोष यादव, दानिश इकबाल, राहुल रोडे व आकाश कांबळे यांनी तो गांजा जप्त केला.