भोंदूबाबा पवन महाराजच्या आलमारीत ‘तंत्रसिद्धी रहस्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:05 PM2018-06-17T23:05:00+5:302018-06-17T23:05:26+5:30

भोंदूबाबा पवन महाराजच्या घरातील आलमारीत पोलिसांना 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अंधश्रद्धेविषयीचे अनेक पैलू ठासून भरले आहेत. ते पुस्तक पोलिसांनी जप्त केले .

'Siddhasiddhi Mystery' by Bhondu Baba Pawan Maharaj | भोंदूबाबा पवन महाराजच्या आलमारीत ‘तंत्रसिद्धी रहस्य’

भोंदूबाबा पवन महाराजच्या आलमारीत ‘तंत्रसिद्धी रहस्य’

Next
ठळक मुद्देकुलूप उघडले : गाडगेनगर पोलीस पथक मुंबईला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भोंदूबाबा पवन महाराजच्या घरातील आलमारीत पोलिसांना 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अंधश्रद्धेविषयीचे अनेक पैलू ठासून भरले आहेत. ते पुस्तक पोलिसांनी जप्त केले .
गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री भोंदू पवन महाराजच्या घराची पुन्हा झडती घेतली. बनावट चावीने त्याची आलमारी उघडली. त्यात 'तंत्रसिद्धी रहस्य भाग - ५' या पुस्तकासह पूजा-अर्चनेचे साहित्य, चिल्लर पैसे, महागड्या साड्या आढळून आल्या. हे तंत्रमंत्रांनी भरलेले पुस्तक राजस्थानच्या अजमेरस्थित मदनगंज किसनगंज येथील मयुरेश प्रकाशनचे आहे. त्याचे लेखक पंडित रमेशचंद्र शर्मा असून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर महाकालीचे छायाचित्र आहे. ते पुस्तक ४१६ पानांचे आहे. या पुस्तकात सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्याचे मंत्र, कुणाला कसे वश करायचे, त्यासाठी वशीकरण मंत्र, गनिमाला आपलेसे करण्याचे मंत्र, दुसऱ्यांच्या मनातील भावना किंवा अन्य ठिकाणी काय सुरु आहे, हे ओळखण्यासाठी कर्णपिशाच मंत्र, काळी विद्या, पंचांगातील आराखडा आदी तंत्रमंत्र लिखित आहेत. याशिवाय बांगला देशात काळ्या विद्येचा जादूटोणा चालतो, त्यातील तंत्रमंत्र सुद्धा पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक भोंदू पवन महाराजने उत्तर प्रदेशातून आणल्याचे सांगण्यात येत आहे. हे पुस्तक वाचूनच तो नागरिकांना जाळ्यात अडकवित होता. या भोंदूने पुस्तकातील बहुतांश तंत्रमंत्र विद्येचा अभ्यास केला. त्याचा उपयोग करून त्याने भक्तांमध्ये अंधश्रद्धा पसरविली, असे निरिक्षण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले आहे.
आई-वडिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
भोंदूबाबा पवनच्या आई-वडिलांची कोठडीत चौकशी केल्यानंतर त्यांना गाडगेनगर पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. आणखी चौकशी करण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. भोंदू पवन अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याने मुंबईतील एखाद्या भक्ताकडे आश्रय घेतल्याची शंका पोलिसांनी वर्तविली.
आलमारीत दीडशेवर महागड्या साड्या
भोंदूबाबा पवनच्या डबलडेकर आलमारीत पोलिसांना दीडशेवर महागड्या साड्या आढळल्या. पवनच्या अंगात देवीचा कथित संचार झाल्यानंतर अनेक महिला-पुरुष त्याचेसमोर नतमस्तक व्हायचे. महिला ओटी भरायच्या. लब्धप्रतिष्ठित महिला पवनच्या भक्त असल्याने त्याला महागड्या साड्या अर्पण करायच्या. शालू, पैठणी, भरजरी साड्यंचा अहेरच पवनला मिळत होता. मात्र, आमचा साडी विक्रीचा व्यवसाय असल्याची बतावणी पवनची आई करीत आहे.

भोंदू पवन महाराजच्या घरातील आलमारीतून 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक जप्त करण्यात आले आहे. पवन महाराज पसार असून त्याचा कसून शोध सुरूच आहे.
- मनीष ठाकरे,
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.

Web Title: 'Siddhasiddhi Mystery' by Bhondu Baba Pawan Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.