लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेनेची युती फिस्कटल्याची माहिती देण्यासाठी शिंदेसेनेने रविवारी बोलावलेली पत्रपरिषद अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे युतीसंदर्भात नेमके काय सुरू आहे, हे अद्यापही अधांतरी आहे. एका वरिष्ठ नेत्यांचा निरोप आल्यामुळे ही पत्रपरिषद रद्द झाली, असे जिल्हाप्रमुख संतोष बद्रे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. मात्र, निरोप कुणाकडून, हे गुलदस्त्यात आहे.
महापालिकेत शिंदेसेनेला अधिक जागा मागितल्याने तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे भाजपचे संजय कुटे, जयंत डेहनकर, शहराध्यक्ष नितीन धांडे, माजी आमदार प्रवीण पोटे-पाटील, शिवराय कुळकर्णी, तर शिंदेसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ, जगदीश गुप्ता, प्रीती बंड, संतोष बद्रे या नेत्यांची चर्चा झाली. पुन्हा २६ डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत ताणू नका व ताणू देऊ नका, असा मंत्र दिला. पण, ताणतणाव सुरू असल्यामुळे इच्छुक उमेदवारांचे बीपी वाढू लागले आहेत.
जलसंधारण मंत्री संजय राठोड आज अमरावतीत
भाजप-शिंदेसेना युतीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेची नेमकी भूमिका कोणती, हे मांडण्यासाठी जलसंधारण मंत्री संजय राठोड हे २९ डिसेंबर रोजी अमरावती येथे येणार आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या अनेक बैठकी आणि चर्चेमध्ये ना. राठोड हे सहभागी झाले होते. त्यामुळे अमरावती महापालिकेत युती होणार की नाही? याबाबत आज स्पष्ट होणार आहे.
माजी मंत्री जगदीश गुप्ता आल्यापावली परतले
- शहरातील मराठी पत्रकार भवनात रविवारी ५:३० वाजता शिंदेसेनेने युतीसंदर्भात पत्रपरिषदेचे आयोजन केले होते.
- शिंदेसेनेचे नेते कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रीती बंड, शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बद्रे आदी भाजप-शिंदेसेनेची युती फिस्कटल्याबाबतची माहिती देणार होते.
- अचानक सूत्रे फिरली. भाजपच्या ३ बड्या नेत्याने शिंदेसेनेच्या वरिष्ठांना युती फिस्कटली नसून आम्ही युतीसाठी तयार आहोत, असा निरोप दिल्याची माहिती आहे.
- पत्रपरिषदेसाठी आलेले माजी मंत्री जगदीश गुप्ता यांना पत्रपरिषद रद्द झाल्याचे कळताच तेदेखील अवाक् झाले नि आल्यापावली परतले, हे विशेष. मात्र शिंदेसेनेचे इतर नेते पत्रपरिषदेकडे फिरकले नाही. शिंदेसेनेला ३५ जागा हव्यात, असे जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केले.
"भाजप युती करण्याच्या मानसिकतेत, किंबहुना आग्रही आहे. युती तुटली असती, तर आज शिंदेसेनेची पत्रपरिषद झाली असती. महापालिकेतील संख्याबळानुसार वाटाघाटी व्हाव्यात, अशी भाजपची भूमिका आहे. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी युती आवश्यक गरज आहे."- शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ते, भाजप
Web Summary : Shinde's Sena abruptly canceled a press conference about their BJP alliance for Amravati elections, causing confusion. Internal disagreements over seat allocation persist despite efforts to negotiate a deal. Minister Sanjay Rathod's visit aims to clarify the alliance status.
Web Summary : अमरावती चुनाव के लिए शिंदे सेना ने भाजपा गठबंधन पर प्रेस कॉन्फ्रेंस रद्द कर दी, जिससे भ्रम पैदा हो गया। सीट आवंटन पर आंतरिक असहमति बनी हुई है, सौदे पर बातचीत के प्रयास जारी हैं। मंत्री संजय राठौड़ की यात्रा का उद्देश्य गठबंधन की स्थिति को स्पष्ट करना है।