अमरावती : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा सीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यास बुधवारी प्रारंभ झाला आहे. मात्र, सर्व्हर डाऊनची अडचण निर्माण झाल्याने गुरुवारीही दिवसभर प्रतीक्षा करून अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आला नाही.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २० जुलैपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी अर्ज करण्यास विद्यार्थ्याचा प्रतिसाद कमी लाभला. २१ आणि २२ जुलै रोजीही सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज भरताना मनस्ताप सहन करावा लागला. काही विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनवरून तर कधी तर विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवर दिलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळपासून विद्यार्थ्याना सर्व्हर डाऊनच्या अडचणीचा सामना करावा लागला.
कोट
सीईटीचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्याचा बैठक आणि मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर पुढे ऑनलाईन प्रक्रिया होत नव्हती. सर्व्हर डाऊनची अडचण दिवसभर झाली. विद्यार्थी प्रतीक्षा करून निघून गेले.
- राजू इंगळे, नेट कॅफे संचालक
कोट
वडिलाच्या स्मार्टफोनवरून सकाळी सीईटीचा ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. पण, सर्व्हर डाऊन असल्यामुळे अर्ज भरता आला नाही. ही तांत्रिक अडचण सायंकाळपर्यंत कायम होती. सर्व्हर डाऊनची समस्या दूर करणे आवश्यक आहे.
- प्रणय कावरे, विद्यार्थी