‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’;  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 11:59 AM2021-05-05T11:59:08+5:302021-05-05T11:59:44+5:30

Amravati news कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता आणि स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण व जनजागृतीसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’ ( कोरोना हरेल, मेळघाट जिंकेल) ही व्हिडीओपटांची मालिकाच तयार करण्यात आली असून, विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

Series of video for tribals in Melghat ; Integrated Tribal Development Project | ‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’;  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’;  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देमेळघाटात जनजागृतीसाठी कोरकू भाषेतून व्हिडीओपटांची मालिका 

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता आणि स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन मेळघाटात व्यापक लोकशिक्षण व जनजागृतीसाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘कोरोना हारतीवा मेळघाट जिटउवा’ ( कोरोना हरेल, मेळघाट जिंकेल) ही व्हिडीओपटांची मालिकाच तयार करण्यात आली असून, विविध माध्यमांतून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी ही माहिती दिली.

आवश्यक दक्षता घेऊन कोरोनापासून दूर राहता येते. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. साथीचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी दक्षतेचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबवणे आवश्यक आहे. मेळघाटातील नागरिक बांधवांना त्यांच्या स्वत:च्या भाषेत माहिती देणे आवश्यक होते, जेणेकरून कुटुंबातील सर्व जण ही माहिती जाणून घेऊ शकतील. त्यामुळे हा उपक्रम नियमितपणे सुरू करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यापुढेही विविध विषयांवर अशी माहिती प्रसृत करण्यात येणार असल्याचे सेठी यांनी सांगितले.

घरोघरी आरोग्य शिक्षण

            मालिकेतील व्हिडीओद्वारे साथीचे संक्रमण, आजाराची माहिती, लक्षणे, घ्यावयाची काळजी, आवश्यक उपचार याबाबत एम.बी.बी.एस., एम.डी. असलेले डॉ. दयाराम जावरकर हे मेळघाटचे सुपुत्र अस्सल कोरकू भाषेत प्रेक्षकांशी संवाद साधतात. ममता सोनकर यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यू-ट्यूब, फेसबूक, व्हाॅट्सॲप आदी सोशल मीडियाद्वारे ही व्हिडीओपटांची मालिका नियमित प्रसारित करण्यात येत असून, त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनाबाबत सर्व शंकांचे निरसन या माहितीतून होते. नागरिकांना आरोग्य शिक्षण देणारे एक नवे माध्यमच याद्वारे उपलब्ध झाले आहे. आरोग्यतज्ज्ञांबरोबरच प्रशासनातील विविध अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आदी व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत व नानाविध विषयांची माहिती नागरिकांना स्वत:च्या भाषेत घरबसल्या मिळू लागली आहे, असेही सेठी यांनी सांगितले.

सुलभ संवाद

अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती स्थानिक नागरिकांना बरेचदा मराठी व हिंदी माध्यमातून मिळते. मात्र, तांत्रिक किंवा महत्त्वाची माहिती स्थानिक बांधवांना जाणून घेणे कठीण जाते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम अस्सल कोरकू भाषेत सुरू करण्यात आला आहे. यात माहिती देणारी डॉक्टर मंडळी ही स्थानिकच असल्याने अत्यंत सुलभ भाषेत ते व्हिडीओद्वारे नागरिकांशी संवाद साधतात.

मेळघाटसारख्या दुर्गम भागात दृक्श्राव्य माध्यम परिणामकारक ठरते. हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाबाबत स्थानिकांकडून अत्यंत स्वागतार्ह प्रतिक्रिया मिळत आहेत. कोरकू भाषेतून यापूर्वीही विविध संदेश प्रसारित केले आहेत. त्याचबरोबरच, आरोग्य शिक्षण देणारी ही मालिका नियमितपणे प्रसारित करण्यात येईल.

- मिताली सेठी, सहायक जिल्हाधिकारी

Web Title: Series of video for tribals in Melghat ; Integrated Tribal Development Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार