कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ निर्मितीच्यावेळी भूसंपादन मोबदल्याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे जप्तीचे आदेश बुधवारी निघाले. मात्र जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्या आश्वासनानंतर जप्तीची कारवाई चार आठवड्यापर्यंत टळली. माहितीनुसार, वडाळी येथील रहिवासी दिलीपसिंह हनुमानसिह चव्हाण यांच्या मालकीची ८ एकर जमीन १९८२ मध्ये संत गाडगेबाबा विद्यापीठासाठी शासनाने संपादित केली होती. यावेळी दिलीपसिंह चव्हाण यांना शेतजमिनीचा अल्पसा मोबदला देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. विद्यमान न्यायालयाने चव्हाण यांना ३७ लाख २२ हजार ११४ रूपये देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र ही रक्कम देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे चव्हाण यांनी तिसरे दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जप्तीसाठी याचिका सादर केली होती. त्यानुसार न्यायालयाने बुधवारी जप्तीचे आदेश दिले असून बेलिफ प्रदिप राऊत हे बुधवारी मालमत्ता जप्तीचा वारंट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी गीत्ते यांनी चार आठवड्याच्या मुदतीची विनंती चव्हाण यांनी केली. या विनंतीचा मान राखण्यात आल्याने जप्तीची कारवाई टळली.
जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्ती टळली
By admin | Updated: August 6, 2015 01:28 IST