बाजार समिती प्रशासनाचा निर्णय : उच्च न्यायालयात याचिका दाखलअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गौडबंगाल असल्याच्या निर्णयाप्रत प्रशासन पोहोचले असून आता सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी फेरनिविदा काढली जाणार आहे. याप्रकरणी एका सुरक्षा एजन्सीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, हे विशेष. जानेवारी महिन्यात बाजार समिती सुरक्षा रक्षक कंत्राट संपुष्टात आला असून नव्याने सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र बाजार समिती प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया कही संचालकांच्या मर्जीनुसार राबविली असल्याची सत्यता बाहेर आली. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदेची जाहिरात प्रसिद्ध करताना ती ‘मॅनेज’ करण्यात आली होती. कंत्राट प्रक्रियेची जाहिरात कुठेही दिसू नये, यासाठी स्थानिक एका वृत्तपत्रात ती प्रसिद्ध करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेपुरती ही जाहिरात प्रसिद्ध करण्याचा डावदेखील रचण्यात आला होता. बाजार समितीने सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत गौडबंगाल केल्याबाबतची तक्रार येथील उपनिबंधकांकडे तीन सुरक्षा रक्षक एजन्सीसह काही संचालकांनी केली होती. दरम्यान हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे एकूणच निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. परिणामी सोमवारी बाजार समिती संचालकाच्या आयोजित सभेत याविषयी चर्चादेखील करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक कंत्राट निविदा प्रक्रियेत झालेल्या गौडबंगालचे वृत्त सातत्याने ‘लोकमत’ने प्रकाशित केले. परिणामी बाजार समिती संचालकासह प्रशासनालादेखील यात लक्ष घालावे लागले. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे बाजार समिती सचिवांनी उपनिबंधकांकडून कारवाईचा बडगा येण्यापूर्वीच ही निविदा प्रक्रिया गुंडाळली.(प्रतिनिधी)‘त्या’ संचालकांच्या मनसुब्यावर फिरले पाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी सुरक्षा रक्षक कंत्राट घेण्यासाठी पडद्याआड हालचाली चालविल्या होत्या. प्रशासनाला हाताशी घेऊन निविदादेखील मॅनेज करण्याचे ठरविले होते. मात्र याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार तसेच उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला निर्णय बदलावावा लागला. त्यामुळे ज्या संचालकांनी सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट घेण्याचे ठरविले होते, त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले.बाजार समितीत सुरक्षा रक्षक कंत्राटाच्या निविदेची कागदपत्रे तपासण्यात आली आहे. याबाबत काही संचालकांच्या तक्रारीदेखील प्राप्त झाल्या आहेत. उच्च न्यायालयात या प्रक्रियेविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द करण्यात आली. - भुजंगराव डोईफोडे, सचिव, बाजार समिती अमरावती
सुरक्षा रक्षक कंत्राट, फेरनिविदा काढणार
By admin | Updated: March 15, 2016 00:35 IST