अमरावती : कोरोनाच्या महागड्या उपचारांसाठी संरक्षण असावे, यासाठी जिल्ह्यात नऊ हजारांवर नागरिकांनी आरोग्य विमा काढल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात काहींना संसर्ग झाल्यानंतर त्यांनी उपचार घेतल्यानंतर बिलाच्या वेळी मात्र अनेकांची फसगत झाल्याची उदाहरणे आहेत. विमा कंपन्यांच्या छुप्या अटींमुळे त्यांना पुरेसा क्लेम मिळाला नसल्याचे दुसऱ्या लाटेतील वास्तव आहे.
यासंदर्भात आयएमएचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ अनिल रोहनकर म्हणाले, ज्यांचा आरोग्य विमा होता, त्यांच्याशी बिलासंदर्भात कुठलाही त्रास झालेला नाही. मात्र, ज्या रुग्णांचा विमा नव्हता, त्यांच्याशी अनेकदा अनेकांचे वादाचे प्रसंग घडले आहेत. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ३५ कोरोना रुग्णालये होती. दाखल रुग्णांपैकी किमान २० टक्के नागरिकांचा आरोग्य विमा असल्याचे निरीक्षण आहे. मुळात आरोग्य विमा काढण्याविषयी नागरिक सकारात्मक नाहीत. याशिवाय अन्य कारणेही असू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचार खर्चाचे तुलनेत कमी रकमेचा विमा मंजूर झाला असल्यास त्याची माहिती रुग्णास व त्याचे नातेवाइकास दिली जात असल्याचे या रुग्णालयांच्या डाॅक्टरांनी सांगितले. बरेचदा कोटेशनच्या तुलनेत कमी रक्कम मंजूर केले जाते. रुग्ण उपचारानंतर बरा झाल्यावर त्याला सुटी देतेवेळी रुग्णालयाचे बिलास विमा भरपाई मिळते. त्यात नंतर एकूण बिलाच्या तुलनेत अटीनूसार उपचार खर्च मंजूर केला जातो. त्यामुळे उर्वरित रक्कम रुग्णाला भरावी लागते. अनेकदा छुप्या अटी विमा कंपनीच्या असतात. त्यामुळे प्रत्यक्ष बिल मंजूर करतेेवेळीच याचा खुलासा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पाईंटर
कोरोनाचे दुसऱ्या लाटेत उपचार : ७०,१५९
किती जणांचा मेडिक्लेम : ९,०००
किती पैशांचा : २ ते ५ लाख
प्रत्यक्ष मंजूर किती? : १ ते २ लाख
बॉक्स
विमा रकमेत कपात कारण
१) विमा कंपनी पूर्ण उपचार खर्च देण्याचा दावा करते. प्रत्यक्षात अटी शर्तीमध्ये अनेक खर्चाची प्रतिपूर्ती करीत नाही. यामध्ये अनेक छुप्या अटी असतात. त्यामुळे उपचाराचे कोटेशन, अप्रूव्हल व विम्याची रक्कम मंजुरीमध्ये तफावत दिसून येते. यामुळे अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवतात.
२) रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना कॅशलेस किंवा खर्चाची प्रतिपूर्ती हे पर्याय असतात. अनेकदा कॅशलेस पर्याय मिळविण्याचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात अनेकदा तसे होत नाही. त्यामुळे अटी व शर्तीनूसार प्रतिपूर्ती केली जात असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
ही घ्या उदाहरणे
१) पाच लाखाचे विमा कवच असताना एका रुग्णाला दीड लाख मंजूर करण्यात आले. त्यामुळे वरचे ६० हजार रुपये रुग्णाला पदरचे द्यावे लागले.
२) विमा योजनेतील तरतूद व प्रत्यक्ष रुग्णालयात होणारा खर्च यामधील फरक रुग्णाचे नातेवाइकाला द्यावी लागत असल्याने त्यांनी कंपनीच्या नावाने शिमगा केला.
३) नव्याने आलेल्या महागडी औषधी व काही किट यांचा समावेश विम्यात नसतो. प्रत्यक्षात रुग्णाला तो द्यावा लागतो. यावरून ग्राहक न्यायालयात जाण्याचेही प्रसंग उद्भवले आहेत.