अधिसूचना जारी : तिवसा, नांदगाव, भातकुली, धारणीचा समावेशअमरावती : जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव, भातकुली व धारणी या तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी नगरपंचायत स्थापन करण्यात आली. गुरूवार ९ एप्रिलला उशीरा नगरविकास विभागाने याविषयीची अधिसूचना जारी केली. त्याअन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी या चारही तालुक्याच्या तहसीलदारांची नगरपंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या घडामोडींमुळे धारणी वगळता उर्वरीत तिन्ही ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तालुका मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत स्थापनेचा निर्णय शासनाने मार्च २०१४ मध्ये घेतला होता. त्यानुसार शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ३४१ चे पोटकलम (१) (१ क) आणि(२) यांच्या तरतुदीनुसार नगरविकास विभागाने तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी व भातकुली या ग्रामपंचायतीचे क्षेत्र नागरी क्षेत्रात संक्रमित होत असल्याविषयी अधिसूचना जारी करून हरकती आक्षेप मागविले होते. कुठेही आक्षेप नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक अहवाल नगरविकास विभागाकडे पाठविला होता. दरम्यान १२ मार्च २०१५ रोज नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अंतिम अधिसूचना प्राप्त नसल्याने जिल्हा प्रशासनाने तिवसा, नांदगाव खंडेश्वर व भातकुली या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ही निवडणूक आता रद्द झाली आहे. सहा महिने प्रशासकीय राजवटचार तालुका मुख्यालयी प्रशासकीय राजवट सहा महिने राहील. या स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचित रचना होईपर्यंत नगरपंचायतीशी संबंधित सर्व अधिकार व कर्तव्ये पार पाडण्याकरिता ही नियुक्ती आहे. याविषयी शासनाचे उपसचिव ज.वा.पाटील यांनी १२ मार्च २०१५ रोजी आदेश निर्गमित केले होते.इच्छुक हिरमुसलेचार पैकी तीन तालुक्यांच्या मुख्यालयी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने राजकारण तापू लागले होते. शुक्रवारी चिन्हवाटप देखील झाले. मात्र, ही निवडणूक रद्द झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
चार नगरपंचायतींवर शिक्कामोर्तब
By admin | Updated: April 11, 2015 00:05 IST