अमरावती : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदमधील बहुतांश शाळांमध्ये ई-लर्निंग क्लासेस सुरू करण्यात आले. या विषयीचा आढावा घेतला असता या क्लासेसबाबत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. संगणक मात्र गुरुजींच्या फावल्या वेळातील खेळासाठीच उपयोगी आहे. काही विजेची सोय नसल्याने तेथील संगणक धुळखात पडले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत असल्याने खासगी शाळांनी या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र माघारण्याची वस्तुस्थिती आहे. कालांतराने ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने राज्यातील काही जिल्हा परिषद शाळेत हा प्रयोग राबविल्या गेला. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ४६ शाळांचा समावेश आहे. ‘ई-लर्निंग क्लासेस अंतर्गत सदर शाळांमधील विद्यार्थ्यांना, दृकश्राव्य माध्यमाद्वारे कविता भाषा इतिहास, गणित यासारखे विषय विद्यार्थ्यांा शिकविण्यासाठी या शाळांमध्ये डिजीटल बोर्डचा वापर करण्यात येत आहे. परिणामी हसत खेळत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याने शिक्षक तसेच पालकांकडून सुद्धा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना सतत अपडेट ठेवावे लागत आहे. यासाठी शाळांमध्येही तेवढेच सजग राहण्याची गरज आहे. ई-लर्निंग क्लासेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंटरनेटवरील अपडेट माहिती डिजीटल बोर्डावर दाखविण्यात येते. दृकश्राव्य माध्यमाद्वारे अतिशय कमी वेळात अधिक परिणामकारक प्रभाव साधल्या जातो. त्यामुळे ई-लर्निंग क्लासेस हा उपक्रम विद्यार्थ्यांना संजीवनी प्रदान करणारा ठरत आहे. ज्या शाळांमध्ये आहे तिथे इंटरनेटची सुविधा,विजेचे कनेक्शन देणे महत्वाचे आहे. (प्रतिनिधी)
ई-लर्निंग क्लासबाबत शाळेमधील विद्यार्थी अनभिज्ञ
By admin | Updated: December 16, 2014 22:44 IST