लोकमत विशेष
चिखलदरा : इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्र १५ जुलैनंतर सुरू झाले आहे. परंतु, तालुक्यातील भिरोजा येथील माध्यमिक विद्यालय अद्याप टाळेबंद असल्याचे चौकशी समितीला आढळून आले. त्यामुळे मेळघाटातील शैक्षणिक दुकानदारी पुन्हा चर्चेत आली आहे.
भिरोजा येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयात शासनातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणारा पोषण आहार व शिष्यवृत्तीमध्ये घोळ प्रशासकीय बाबीमध्ये अनियमितता असल्याची तक्रार शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्राप्त झाली होती. त्यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सदस्य समितीला चौकशीचे आदेश दिले होते. २१ सप्टेंबरपर्यंत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र पाठवण्यात आले होते. समितीमध्ये चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके, विस्तार अधिकारी रामेश्वर माळवे व शालेय पोषण आहार अधीक्षक नीलेश तालन यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, या समितीच्या सदस्यांना येथे गेल्यावर धक्काच बसला.
इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शाळा सुरू असल्या तरी वर्गखोल्यांना कुलूप असल्याचे आढळून आले त्यामुळे चौकशी समितीला चौकशी करता आली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही
बॉक्स
आदिवासी विद्यार्थ्यांची परवड
मेळघाटात संस्था उघडून शैक्षणिक दुकानदारी सुरू असली तरी कायम विनाअनुदानित तत्त्वावर भिरोजा येथील ही शाळा आहे. शासनाने १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत वर्ग सुरू केले असले तरी या शाळेला कुलूप असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता आदिवासी पालकांनी केला आहे
बॉक्स
माध्यमिक शिक्षणाधिकारी झोपेतच?
अमरावती येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या अधिनस्थ असलेल्या मेळघाटातील माध्यमिक शाळा कुलूपबंद असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तक्रार मिळाल्यावर चौकशीचे आदेश दिले. तोपर्यंत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व त्यांच्या अधिनस्थ अधिकारी मेळघाटात फिरकतच नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भिरोजा शाळेवरील २१ सप्टेंबरपर्यंत चौकशी अहवाल प्राप्त झाला का, पुढील कारवाई काय, या संदर्भात वारंवार मोबाईलवर संपर्क केला व संदेश पाठविला असता, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रफुल्ल कचवे हे मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचे दिसून आले.