अमरावती : दरवर्षी उन्हळयात चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर दरवर्षी उपाययोजनांसाठी निधी खर्च करण्यात येतो. सतत होणारा खर्च टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजनांचा प्रस्ताव गतवर्षी ११ जुलै रोजी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने घेतला होता. मात्र, तेव्हापासून हा प्रस्तावच पाणीपुरवठा विभागाकडून बेदखलरीत्या पडून आहे.
चिखलदरा तालुक्यातील १० ते १२ गावात उन्हाळयाच्या दिवसात पिण्याचे पाण्याचा पुरवठा टँकरव्दारे करावा लागतो. विशेष म्हणजे ही गावे दरवर्षी पाणी टंचाईच्या आराखडयात समाविष्ट असतात. यावर उपाययोजनांसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे एकझिरा, तारुबांदा, धरमडोह, मनभंग, पाचडोंगरी, कोरडा, कोयलारी अशा विविध गावांत उन्हाळयात पाणीटंचाई भासते. यामुळे कायमस्वरुपी पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करण्यसाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकारण विभागाकडे सादर केला होता. परंतु या विभागाने पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत सदर कामाला नकार दिला होता. परिणामी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्ट्रीने झेडपी पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलव्यवस्थापन समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी मजीप्राला दिल्या होत्या. मात्र, या प्रस्तावावर पुढे काय झाले याचा अजूनही थांगपत्ता नाही.