आदेश : विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशअमरावती : एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ३ ते २६ जानेवारी या काळात दरवर्षी प्रत्येक शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्याचे परिपत्रक राज्य शासनाने निर्गमित केले आहे. विद्या हे धन सर्वश्रेष्ठ धन आहे. ज्याच्या जवळ हे धन तोच खरा धनवान, असा संदेश सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे. स्त्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी अहोरात्र कार्य केले. त्याला जगाच्या इतिहासात जोड नाही. अज्ञान, अनिष्ठ रुढी व परंपरांच्या विळख्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रीकडे तुच्छ व उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले जात होते. अशा काळात समाजाची वक्रदृष्टी स्वीकारुन स्वकीयांना चूल व मूल यापासून बाहेर काढण्यासाठी त्यांनी पुण्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली आणि सामाजिक परिवर्तन चळवळीचा पाया घातला. सावित्रीबाई यांच्या या महान कार्याची ओळख शाळांमधील विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान दरवर्षी ३ ते २६ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, स्थलांतरित पालकांच्या मुलींच्या अखंडित शिक्षणाची हमी देणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सर्जनशिलतेला वाव देणे, या उद्देशाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान’ राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशानुसार सर्व शाळांमध्ये युध्दस्तरावर हे अभियान राबविले जात आहे.
्रप्रजासत्ताक दिनापर्यंत ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान
By admin | Updated: January 7, 2016 00:24 IST