अचलपूर : गत वर्षभरापासून जनता कोरोना संसर्ग महामारीचा सामना करीत जीवन जगत असतानाच मजुरीवर, रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊननंतर अन्नधान्य तसेच गोडे तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. अचलपुरात सोयाबीनचे एक किलो तेल १५० रुपयांना मिळत आहे. खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, केंद्र शासनाविरोधात जनतेत तीव्र संताप आहे.
पेट्रोलने शंभरी गाठल्यावर खाद्यतेलानेसुद्धा दीडशेचा पल्ला गाठला आहे. एरवी ७० ते ८० रुपये प्रतिकिलो मिळणारे गोडे तेल आज १५० रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, यात दररोज वाढच होत आहे. मार्च महिन्यात राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. याचा परिणाम सर्वच स्तरांवर होत असून, कोरोना संसर्गाच्या महामारीत महागाईचा मार जनतेला सोसावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती, दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशात कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट या विविध कारणांमुळे खाद्यतेलाच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाचा दर १५० रुपये, तर शेंगदाणे तेलाचा दर १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. अचलपूर येथील बहुतांश नागरिक खाण्याकरिता सोयाबीन तेलाचा वापर करतात. हॉटेल, रेस्टॉरेंट व्यावसायिकसुद्धा खाद्यपदार्थ बनविण्याकरिता सोयाबीन तेलाचाच वापर करतात.
बजेट कोलमडले
खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे अचलपुरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकघरात तेलाचा वापर कमी करावा लागत आहे. चपात्या बिनातेलाच्या, तर भाजीतही अत्यंत कमी प्रमाणात तेल टाकले जात आहे. त्यामुळे जेवणाची चव खालावली आहे. कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. तेलाचे भाव प्रचंड वाढल्याने फोडणीकरितासुद्धा कमी तेल वापरण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.