लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरातील वैभव मंगल कार्यालयाच्या टिनपत्र्याच्या छताची लोखंडी कैची बुधवारी दुपारी वादळी पावसाने उडाली. यामुळे टीनपत्रे इतस्त: विखुरली, तर विटा, काँक्रिटच्या ढिगाऱ्यासह काही टिनपत्रे लग्न सोहळ्यातील वऱ्हाडींवर कोसळली. यात तब्बल ५० जण जखमी झाले असून, सात जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वऱ्हाडींनी परिसरात ठेवलेल्या अनेक दुचाकींचाही चुराडा झाला आहे. मूर्तिजापूर रोडवरील या मंगल कार्यालयात दर्यापूर येथील खोलापुरी गेट परिसरातील माणिकराव सोळंके यांच्या मुलीचा विवाह चिंचखेड (ता. भातकुली) येथील दिवाकर खानंदे यांच्या मुलाशी वैभव मंगल कार्यालयात बुधवारी झाला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेवणावळी सुरू असतानाच वादळी पावसाने मंगल कार्यालयाचे टिनपत्रे उडाली. या टिनपत्र्यांचा डोम कोसळल्याने भिंतीच्या विटा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या. पाऊस थांबताच आणि मंगल कार्यालयाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील नागरिक व रुग्णसेवक धावून गेले.
दोघे जिल्हा सामान्य रुग्णालयातअमोल गवळी (रा. वाठोंडा हिंमतपूर. ता. दर्यापूर) व रंगराव भाकरे (रा. विश्रोळी, ता. चांदूर बाजार) या दोघांना छातीवर विटांचा मार लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये दोन वर्षांचा चिमुकलाउपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या जखमींमध्ये प्रकाश दाभेकर, देवीदास तेलखडे, श्रीकांत काळपांडे, रोहित तसरे, अंकित ठाकरे, नवल ठाकरे, ऋतिक ठाकरे, श्रीकृष्ण दाभेकर , पांडुरंग तेलखडे, पवन सपाटे, चरणदास ठाकरे, मालू खानंदे, पायल राठोड, संजय राठोड, वेणू चक्रे, सुरेंद्र सोळंके आदींचा समावेश आहे. दोन वर्षांचा चिमुकला बिट्टू कांबळे गंभीर जखमी झाला आहे. इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सर्वांची बाहेर पडण्याची धडपडटिनपत्रे मंगल कार्यालयात कोसळल्याने लग्न सोहळ्यामध्ये एकच धावपळ उडाली. सर्वच जण वाट दिसेल तिकडे धावत होते. काही वेळानंतर वारे शांत झाल्याने व पाऊस थांबल्याने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले.
१० मिनिटातच आनंदावर विरजण
लग्नसोहळ्याला उपस्थित वऱ्हाडींमध्ये पाऊसपाण्याचीच चर्चा झडत असताना वादळी वाऱ्यांसोबत पाऊस त्यांच्या पुढ्यात दाखल झाला आणि पुढच्या अवघ्या १० मिनिटात मंगल कार्यालयातील आनंद सोहळ्याला गदारोळात पालटून निघून गेला.