दिग्गजांच्या रॅली : ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीतअमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केले. शक्ती प्रदर्शनासाठी या उमेदवाराद्वारे आयोजित रॅलींमुळे आज शहरातील मुख्य रस्ते गर्दीने फुलून गेले होते. श्याम चौक, राजकमल, इर्विन, बसस्थानक, चपराशीपुरा चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.अमरावती, बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी शनिवारी शेवटच्या दिवशी राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस होती. मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. शेकडो वाहनांवर विविध पक्षांचे ध्वज झळकत होते. चौकाचौकांत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, उमेदवारांच्या समर्थनार्थ नारेबाजी सुरू होती. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या रॅली समोरासमोर येऊ नयेत, याची दक्षता पोलिसांनी घेतली होती. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला रॅलीची परवानगी देताना पोलीस विभागाने वेळ आणि मार्ग निश्चित केले होते. त्यानुसार मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. अमरावती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी अमरावती तहसील कार्यालय तर बडनेरा मतदारसंघासाठी प्रशासनाने भातकुली तहसील कार्यालय हे स्थळ ठरविले होते. घोषणा, नारेबाजीने दुमदुमले शहर२० सप्टेंबरपासून ठरविलेल्या मतदारसंघनिहाय अमरावती व भातकुली तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली. शनिवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असल्यामुळे सकाळपासूनच उमेदवारांची गर्दी पाहावयास मिळाली. अमरावती व भातकुली तहसील कार्यालय परिसरात लांब अंतरावरच रॅली आणि समर्थकांची गर्दी थांबवून ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आतमध्ये जाताना उमेदवारांसह पाच जणांना परवानगी होती. मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मुख्य मार्गावरुन काढण्यात आलेल्या रॅलीतील गर्दीमुळे रस्ते तुंबले होते. प्रमुख चौकात वाहतूक विस्कळीत सुद्धा झाली. राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी पोलिसांनी रॅलीची परवानगी देताना निश्चित केलेल्या वेळेतच उमेदवारी अर्ज सादर करण्याची किमया केली. अमरावती, बडनेरा मतदार संघातून काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, बसप, अपक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाने कोण किती पाण्यात याचा अंदाज मतदारांना आला आहे. मात्र १५ आॅक्टोबरला उमेदवारांचे १भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार असून १९ आॅक्टोंबर रोजी मतमोजणीनंतर स्थिती स्पष्ट होईल.
उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनाने गजबजले शहरातील रस्ते
By admin | Updated: September 27, 2014 23:05 IST