अपघात वाढले : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, कंत्राटदाराची मनमानी, पादचारी, वाहनधारक त्रस्त नरेंद्र जावरे अचलपूरपरतवाडा शहरातील रस्ता चौपदरीकरणाच्या कामात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा कमकुवतपणा सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारा ठरला असून कंत्राटदाराने रस्त्यावरच खडीचे ढीग टाकल्याने अपघात वाढले आहेत. परतवाडा शहरात रस्ता चौपदरीकरणाचे काम मागील सहा महिन्यांपासून अगदी संथगतीने सुरू आहे. जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंतच्या या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले आहे. जयस्तंभ चौक ते आठवडी बाजारपर्यंतच्या रस्त्याचे एका बाजूचे काम सुरू असल्याने एकेरी रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. एका बाजूचा रस्ता बंद करण्याचा निर्णय स्वत: कंत्राटदारानेच घेतल्याचे दिसते. परंतु असे असूूनही एकेरी रस्त्याच्या कडेला कंत्राटदाराने गिट्टीचे ढीग लावून ठेवले आहेत. यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण होेत आहे. परतवाडा, अमरावती, इंदोर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी, चांदूरबाजार, बैतूल याच मार्गावरून वाहतूक होत असल्याने प्रवाशांसह वाहनधारक त्रस्त झाले आहेत.भररस्त्यावर गिट्टीचे ढीग टाकल्याने होणारी अडचण उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने यात बांधकाम विभागाचा नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या मार्गावर एखादा मोठा अपघात घडण्यापूर्वी कंत्राटदाराने रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील त्रस्त नागरिकांनी केली असून याकडे लक्ष देण्याची मागणीही केली आहे. बांधकाम विभाग कमजोरसहा महिन्यांपासून संथगतीने रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने व कंत्राटदाराने सर्व नियम पूर्णत: धाब्यावर बसविले आहे. एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे फलक लावण्यासोेबतच ज्या रस्त्यावरून वाहतूक करण्यात येणार आहे, तो रस्ता व्यवस्थित करणे गरजेचे आहे. मात्र, ज्या रस्त्याने वाहतूक सोडण्यात आली, त्या रस्त्यावर पूर्णत: खड्डे पडले आहेत. ते खड्डे भरण्याचे कार्यदेखील कंत्राटदाराने केले नाही. किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराकडून तसे करून घेतले नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिक, पादचारी आणि दुचाकीचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पालकमंत्र्यांचे आदेशअचलपूर नगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचा वेग वाढविण्यासोबत वाहतुकीचा अडथळा दूर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यावर १५ दिवसांचा कालावधी लोटला असताना बांधकाम विभाग किंवा कंत्राटदाराने कोणतीच दखल घेतली नाही. नोटीस देऊ रस्त्यावरील गिट्टीचे ढिगारे न हटविता एकेरी रस्त्यावरूनच वाहनांची ये-जा सुरू आहे. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला गिट्टीचे ढिगारे व मोठे खड्डे यामुळे अपघात होत आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने संबंधित शाखा अभियंता चंद्रकांत ताठे यांच्याकडे विचारणा केली असता त्यावर कंत्राटदाराला नोटीस देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र दिवसभर होणारा वाहतुकीचा खोळंबा दिसू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतूक विभाग हतबल रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग परतवाडा शहरात कार्यान्वित आहे. ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना केवळ १९ कर्मचारीच येथे कार्यरत असल्याचे दिसते. चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, विदर्भ मिल स्टॉप, बसस्थानक, आठवडी बाजार चौक, जयस्तंभ चौक, अंजनगाव, चिखलदरा व बैतुल स्टॉप हे आंतरराज्यीय महामार्गावरील प्रमुख वर्दळीचे ठिकाण आहेत. ही सर्व वाहतूक सांभाळताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांना ताण सहन करावा लागतो. अशाच कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता सुरळीत करण्याऐवजी वाहतुकीचा खोळंबा करीत असल्याने वाहतूक विभागसुध्दा हतबल ठरला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी तैनात आहेत. परंतु रस्त्यावर गिट्टीचे ढिगारे टाकून ठेवल्याने या भागात वाहतुकीचा खोळंबा होत आहे. संबंधित कंत्राटदारासह बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यायला हवे.- एस.सी.चौरे,वाहतूक निरीक्षक.परतवाडा.
रस्ता चौपदरीकरणामुळे वाहतुकीचा खोळंबा
By admin | Updated: May 24, 2015 00:33 IST