नापेर, कमी पावसाच्या जमिनीवर लागवड,
अंजनगाव सुर्जी : मेद कमी करणारा, संधिवातावर गुणकारी सालवृक्ष दुर्लक्षित आहे. भरड जमीन, कमी पावसाच्या क्षेत्रावर येणारे हे झाड शेतकऱ्यांसाठी वनदान ठरणार असल्याची माहिती स्थानिक श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख मंगेश डगवाल यांनी दिली.
सालफळाला विदर्भात सालई, सालफळ व सिलाई या नावाने ओळखले जाते. या वृक्षांच्या खोडांची व फांद्यांची साल फारच वैशिष्ट्यपूर्ण पातळ करड्या रंगाची व दरवर्षी गळून पडणारी असल्यामुळे त्याचे सालई हे नाव पडले आहे. संस्कृत मध्ये यास शल्लकी व शलाका म्हणतात. या वृक्षाची ओली फांदी दिव्याच्या वातीसारखी पेटते. याच गुणधर्मामुळे केरळ मधील आदिवासी रात्री जंगलातून जाताना या झाडाची फांदी तोडून मशालीसारखी पेटवतात. पाच मीटर वाढणारा सालई वृक्ष हिवाळ्याच्या शेवटी फुलायला सुरुवात होते. जानेवारी ते मे अखेर फुलण्याचा व फळ धारण करण्याचा काळ असतो. त्याच्या फांद्यांच्या टोकांना पिवळट-पांढरट फुले येतात. त्याची फळे छोटी व त्रिकोणी आकाराची असतात.
अंजनगाव परिसरात या वृक्षाची फळे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान बाजारात विकायला येत असतात. साधारणतः १२० रुपये किलो, २० रुपये पावशेरचा एक डबा या दराने ती बाजारामध्ये विकली जातात. परंतु, त्याचे प्रमाण फार कमी आहे. याच्या कोवळ्या फुलांचे लोणचे करतात व ते संधिवात या रोगावर औषधी म्हणून दिल्या जाते. हे लोणचे थोडेही अधिक प्रमाणात खाल्ल्यास गुंगी यायला लागते.या फळांचा उपयोग संधिवातावर करतात. पांढरा डिंक देणारा सपुष्प वनस्पतीमधील हा एकमेव वृक्ष आहे. या डिंकाचा एक गुण म्हणजे मेद (फॅट) कमी करणे आहे. त्यामुळे याचा उपयोग लठ्ठपणा घालविण्यासाठी करता येईल. ज्या भागांमध्ये जमिनीची सुपीकता कमी आहे, अशा भागांमध्ये वनीकरणाकरिता या वृक्षाचा उपयोग करता येईल, या वृक्षाची रोपे बियांपासून तयार करता येतात. तथापि, दहा वर्षांमध्ये या वृक्षाचा फक्त नऊ सेमी घेर तयार होतो, तर ६५ वर्षांत ३० सेंमी एवढेच ते घेरात वाढते. वापर, लागवडीबद्दलची जनजागृती केल्यास नॉन टिंबर फॉरेस्ट प्रॉडक्ट म्हणून अर्थकारणास चालना मिळू शकते, असे मंगेश डगवाल वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख यांनी त्यांच्या सर्वेक्षणातून सांगितले. प्रभा भोगावकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.