पान २ ची लिड
चांदूर बाजार : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी लक्षात घेता रात्रीची संचारबंदी सुरू आहे. मात्र, तालुक्यात संचारबंदीच्या वेळेतही अनेक प्रतिष्ठाने सुरू राहत असल्याने याकडे पालिका प्रशासन व तालुका प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले जात आहे. शहर व तालुक्यात महसूल व नगरपालिकेची पथके बेपत्ता झाली आहेत. ग्रामीण भागात २०० ते ३०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न होत असताना कुठलीही कारवाई केली जात नाही. कोरोनाची स्थिती नेमेची येतो पावसाळा अशी झाली आहे. कुणीही त्याबाबत फारसे सजग नाही. ना सामान्य लोक ना प्रशासन. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर निव्वळ कागदावर आहे.
दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला आहे. ते पाहता जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठाने सायंकाळी पाचनंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तहसीलस्तरावर मात्र या आदेशाला चांदूर बाजार तालुक्यात तिलांजली दिली जात आहे. सायंकाळी ५ वाजतानंतर अनेक दुकाने, पान टपऱ्या, पाणीपुरीचा गाड्या सर्रास सुरू असतात. तसेच बार व रेस्टॉरंटही सुरू असतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून बाजारपेठेत सुरू असलेल्या दुकानांवर पालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. तसेच ग्रामीण भागातील हॉटेल, हातगाड्यांवरील भेळ, गुपचूपच्या गाड्यासुद्धा सर्रास सुरू असतात. यावर तालुका यंत्रणेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. शहरात ऑटो, काली-पिवळी वाहनातून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. यावर तालुका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नसल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे.
बॉक्स
किरकोळ दुकानदारांना फटका
कोरोना विषाणूचा देशात पुन्हा शिरकाव झाला असून सर्वाधिक संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. धोक्याची घंटा लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावरून विविध निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी गर्दी टाळणे हा यावरचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याने प्रशासन स्तरावर सातत्याने आव्हान केले जात आहे. संसर्गजन्य असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, या जनता कर्फ्यूचा फटका केवळ किरकोळ दुकानदारांना बसला आहे.
बॉक्स
प्रशासन बेवचक
अद्यापही जिल्ह्यातील आठवडी बाजार व मंगल कार्यालय बंद आहे. मंगल प्रतिष्ठान सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार व्यापारी वर्गातर्फे मागणी करण्यात आली. तरीही संबंधित प्रतिष्ठाने अद्यापपर्यंत उघडण्यात आलेली नाही. मात्र, जी प्रतिष्ठाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ती प्रतिष्ठाने सायंकाळी साडेसहापर्यंत सर्रास उघडी असतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.