लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळावे, यासाठी आबालवृद्धांसह ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र, लसींचा साठा अल्प असल्याने केंद्रावर नंबर लावण्यासाठी रेटारेटी करीत आहे. शुक्रवारी जिल्ह्याकरिता १३ हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असला तरी तो दोन दिवस पुरेल इतकाच आहे. रविवारी लस संपलेली असेल. शुक्रवारी केवळ कोविशिल्ड उपलब्ध झाली. परंतु, ज्या नागरिकांना लसींचा दुसरा डोज कोव्हॅक्सिन घ्यायचा आहे, त्यांना केंद्रावर लस मिळाली नव्हती. अमरावती, बडनेरा शहरात एक-दोन लसीकरण केंद्रांवरच कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील केंद्रांवर लस पुरविण्यात येते. १४ तालुके, महापालिका हद्दीत व खासगी दवाखान्यात लसींचा पुरवठा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात केला जातो. लसींच्या अत्यल्प पुरवठ्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिक रांगेत ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र अनुभवता आले. शुक्रवारी महापालिका लसीकरण केंद्रावर सकाळी ११ नंतर लस पोहोचली होती. शासकीय आणि खासगी अशी जिल्ह्यात ७३ लसीकरण केंद्रे आहेत.