३२५ पेक्षा जास्त निर्मित : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौर ऊर्जेने पाणी पुरवठाअमरावती : सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक पानवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करुन वाघांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघांनी पाणी व मांस भक्षाच्या शोधासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेर जाऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ९२५ पाणवठे असून यात नैसर्गिक ६०० तर कृत्रिम ३२५ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांचे असल्यामुळे काही दुर्गम भागात टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामळे दुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर सौर ऊर्जेने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कृत्रिम पाणवठ्यांमध्ये स्वंयचलित प्रणालीने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणवठे निर्माण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असा काही वर्षांपूर्वींचा समज होता. परंतु हल्ली मेळघाटात वन्यपशुंना कृत्रिम पाणवठ्यांनी जीवनदान मिळत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौरऊर्जा, हातपंप, सिमेंट बंधारे, प्लॉस्टिक टाकीद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पारा ४५ अंश सेल्सिअसवर जात असून मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता वनअधिकाऱ्यांनी नैसर्गिक पाणवठ्यांना पर्याय म्हणून कृत्रिम पाणवठ्यांकडे लक्ष वेधले आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे विशेषत: वाघांची शिकार करण्याच्या मनसुब्याने सापळा रचणाऱ्यांना या भागात पोहोचणे कठीण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वाघांची शिकार करण्याच्या घटना घडत असे. परंतु यावर्षी कृत्रिम पाणवठ्यांवर मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने वाघ आपली सीमा सोडून बाहेर पडण्याची शक्यता धुसर झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्याने मेळघाटच्या काही भागातील जंगलात उन्हाळ्यात आजही हिरवळ आहे. त्यामुळे जंगलात असलेली हिरवळ ही वाघांचे भक्ष असलेल्या वन्यपशुंच्या आहारासाठी ते पोषक मानले जात आहे. (प्रतिनिधी)मध्यंतरीच्या पावसाने बराच दिलासा मिळाला. जंगलात वन्यपशुंसाठी उत्तम वातावरण आहे. वाघांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असल्याने ते संरक्षित क्षेत्रातच वावरत आहेत. कृत्रिम पाणीपुरवठ्यामुळे बरीच समस्या निकाली निघाली आहे.- दिनेश त्यागी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.
कृत्रिम पाणवठ्यांमुळे वाघांना दिलासा
By admin | Updated: April 28, 2015 00:13 IST