११ गावे योजना कुचकामी : १५ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण वरूड : राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्णत: कुचकामी ठरली आहे. राजुराबाजार गावांत उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झाला असून ही योजना राजुराबाजार ग्रापंला हस्तांतरित करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास १५ मार्चपासून उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ११ गावे पाणीपुरवठा योजनेचे सद्यस्थितीत तीनतेरा वाजले आहेत. १० गावे योजनेंतर्गत पाणी घेत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राजुराबाजार येथील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. याची पूर्तता न झाल्यास १५ मार्चपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी जि.प. सीईओंना सादर निवेदनातून दिला आहे. सद्यस्थितीत राजुराबाजार गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना सात दिवसांआड पाणी मिळते. केवळ दोन खासगी बोअर अधिग्रहित करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्यामुळे या योजनेत समाविष्ट इतर १० गावांनी पर्यायी व्यवस्था करून सदर योजनेतून पाणी घेण्यास नकार देऊन तसे ठरावसुद्धा पारित केले. तरीसुद्धा योजनेची विद्युत देयके या ग्रामंपचायतींवरच लादली जात आहेत. सद्यस्थितीत या योजनेतून केवळ राजुराबाजार ग्रामपंचायत पाणी घेत आहे. परंतु पाणीटंचाईचे कायम सावट असल्याने पाणीपुरवठा समितीने ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी, अशी मागणी सरपंच रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरेसह सदस्यांनी केली आहे. भविष्यात योजनेतून बाहेर पडलेल्या १० गावांना पाणीटंचार्ई भासली, तर नियम व अटींच्या अधीन राहून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासनसुद्धा पत्रामध्ये दिले आहे. योजनेवर विद्युत देयके किंवा इतर सर्व प्रकारची थकबाकी निरंक करून ही योजना हस्तांतरित करण्यास तयार आहे. या योजनेतून पाणी मिळाल्यास राजुराबाजारच्या नागरिकांची तहान भागविणे शक्य होईल. योजनेचे हस्तातंरण न केल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांसह १५ मार्चपासून वरूड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि जनआंदोलन करण्याचा इशारा जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सादर पत्रातून दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजुराबाजारची तीव्र पाणीटंचाई चव्हाट्यावर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
राजुराबाजारला पाणी टंचाईच्या तीव्र झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:18 IST