आयुक्तांचा निर्णय : ४०.५३ कोटी रुपयांत ठरला कंत्राटअमरावती : येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी आता कोणत्याही भूमिपूजनाची औपचारिकता करणार नाही, थेट काम सुरु करुन दोन वर्षांत हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता जीवन सदार यांनी दिली.राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या निर्मितीचे काम नागपूर येथील चाफेकर अॅन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्याच्या कंत्राटावर शिक्कामोर्तब झाल्याच्या पार्श्वभूमिवर ते पत्रपरिषदेत बोलत होते. सदार यांच्या मते उड्डाण पूल निर्मितीसाठी राबविण्यात आलेल्या कंत्राट प्रक्रियेत पाच कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी कमी दराच्या ४१.०६ कोटी रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. प्रशासनाने वाटाघाटीच्या वेळी सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ५६.१० लाख रुपये कमी करण्यात यश मिळविले. त्यानुसार उड्डापुलाच्या निर्मितीसाठी ४०.५३ कोटी रुपयांची निविदा मान्य करुन पुढील करारनाम्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे जाणार आहे. सन २०१३- २०१४ च्या बांधकाम दरानुसार निविदा मंजूर केली असून यात आयुर्विमा, मजूर, डिझाईन, व्यवस्थापन खर्च असे एकुण ३५ टक्के वाढीनुसार निविदेला मान्यता दिली आहे. ३२.६२ कोटी रुपयांची चाफेकर यांनी निविदा सादर केली होती. वाटाघाटीनंतर ही रक्कम ३५.६० कोटी रुपयांची ठरविण्यात आली. पुलाला एकुण पाच अप्रोच मार्ग राहणार असून स्थानिक शंकरनगर परिसरातील ४०० चौरस फूट जागा पुलाच्या निर्मितीसाठी हस्तांतरित केली जाणार आहे. १० कोटी रुपये तिजोरीत जमा आहेत. (प्रतिनिधी)
राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन नको; आता थेट काम सुरु
By admin | Updated: August 6, 2015 01:27 IST