खासदारांचा पाठपुरावा, माथाडी कामगारांना दिलासा
अमरावती : केंद्रीय वखार महामंडळाचे (सीडब्लूसी) बडनेरा रेल्वे मालधक्का येथे २०१६ नंतर प्रथमच गहू घेऊन मालवाहतूक रेल्वे रॅक गुरुवारी दाखल झाली. मालवाहू रॅकचे खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी माथाडी कामगारांनी जल्लोष साजरा केला.
केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याबद्दल व्यापारी, कामगार व नागरिकांनी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानले. आता हजारो माथाडी कामगारांना रोजगार मिळणार आहे. बडनेरा रेल्वे स्टेशन स्थित मालधक्का दुर्गापूर रोड येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतर तेथे शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने जीवनावश्यक धान्ये, खते आदींची चढउतार होणे अपेक्षित होते. परंतु तेथे सन २०१६ पासून रॅक येत नव्हती. त्याऐवजी ती अकोला किंवा धामणगाव येथे रिकामी करण्यात येत होती. खासदार राणा यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी माथाडी कामगारांना घेऊन दिल्ली गाठली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व तत्कालीन अन्नपुरवठा मंत्री स्व. रामविलास पासवान यांचे सॊबत बैठकी घेतल्या. गत चार वर्षात इथे रॅक नसल्यामुळे केंद्र शासनाचे जवळपास ७२ कोटींचे नुकसान झाले असून भविष्यात असे नुकसान होऊ देणार नसल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.