अमरावती : जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकीदारांची ९०० कोटीपर्यंत कर्जमाफी झाल्याने प्रथमच यंदा रबीचे उच्चांकी ३४ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होत आहे. मात्र, यात जिल्हा बँकेचे रबी कर्जवाटप निरंक असल्याचा अग्रणी बँकेचा अहवाल आहे.
यंदा खरिपाचे विक्रमी पीक कर्जवाटप झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांपासून रबीचे पीक कर्जवाटपास सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील बँकांना ४३० कोटींचे लक्ष्यांक दिले आहे. त्याच्या तुलनेत जिल्ह्यातील बँकांनी सद्यस्थितीत १५ हजार ४७१ खातेदारांना १४७.५० कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही ३४ टक्केवारी आहे. खरिपासाठी १७२० कोटींचे लक्ष्यांक असताना १,२३,७८१ शेतकरी खातेदारांना १०७३.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ६२ टक्केवारी आहे व मागील सहा वर्षांत पहिल्यांदा उच्चांकी कर्जवाटप करण्यात आले आहे.
जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार अलाहाबाद बँकेने २.२९ कोटी, आंध्रा बँक ५२ लाख, बँक ऑफ बडोदा २.९३ कोटी, बँक ऑफ इंडिया ५.०२ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ३१.३९ कोटी, कॅनरा बँक १.३४ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३०.०६ कोटी, कार्पोरेशन बँक १ लाख, इंडियन बँक १६ लाख, इंडियन ओव्हरसीज १.२१ कोटी, पंजाब नॅशनल १.३१ कोटी, एसबीआय ५१.६० कोटी, युको ४३ लाख, युनियन बँक ३.२५ कोटी, ॲक्सीस ३.८७ कोटी, आयडीबीआय ७७ लाख, एचडीएफसी ५.९० कोटी, आयसीआयसीआय ४.२२ कोटी, विदर्भ कोकण १.२३ कोटी रुपयांचे रबी कर्जवाटप करण्यात आले आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील बँकांचे वाटप
यंदाच्या रबी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना २९४.४० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत १५,४०० शेतकरी खातेदारांना १४६.२७ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ५० आहे. ग्रामीण बँकांना ३.६० कोटींच्या कर्जवाटापाचे लक्ष्यांक असताना ७१ शेतकऱ्यांना १.२३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३४ आहे. याशिवाय जिल्हा बँकेला १३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना वाटप निरंक आहे.