शेगाव नाकारोडवरील घटना : शिकार प्रतिबंधक पथक, शिघ्र कृती दलाची कारवाई अमरावती : ससे व भोरी पक्षाची शिकार करणाऱ्या चौघांना शिकार प्रतिबंधक पथक व शिघ्र कृती दलाने कारवाई करीत अटक केली. रवी मुका भोसले (२४), महेंद्र नदरीलाल पवार (३७), राधे सर्वे पवार (१८ सर्व राहणार पिंपळझिरा) व शाम कैलास सोळंके (३२,रा. वाठोंडा) अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईमध्ये कार्स संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. संघटनेचे राघवेंद्र नांदे, चेतन भारती, रोशन अबु्रक, शुभम गिरी, भूषण मारोटकर, संतोष मनवर, यशवंत शेंडे व मयूर बुतखडे यांना शिकाऱ्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पाळत ठेऊन मंगळवारी वनविभागाला माहिती कळविली. त्यानुसार उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिना, सहायक उपवनसरंक्षक अशोक कवीटकर यांच्या मार्गदर्शनात शिकारी प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश धंदर, शिघ्र कृती दलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाजगे यांच्यासह वनपाल वानखडे, वडाळीचे वनपाल आर.एन.घागरे, वनरक्षक अनिस शेख, निलेश करवाडे, पी.व्ही.कोहळे व चालक बाबुराव येवले यांनी शेगाव नाका परिसरातील घटनास्थळ गाठून आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून दोन ससे, भोरी प्रजातीचे पक्षी व दोन नॉयलॉनचे जाळे जप्त केले. वनविभागाने आरोपींविरुद्ध वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ नुसार गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना फ्रेजरपुरा ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी चारही आरोपींना वनकर्मचाऱ्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)लोखंडे पसारचारही आरोपी हे शेगाव नाका परिसरात फिरून ससे व पक्षांची शिकार करीत होते. दररोज शिकार करून ससे विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. ते दररोज दोन ते तीन ससे विक्री करीत असल्याची माहिती आहे. यासंबधाने या आरोपीने वर्धेकरवाडी परिसरातील लोखंडे नामक इसमाला ससा विकला होता. त्याला वनविभागाने ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालविले असता तो इसम पसार झाला. दोन ससे वनविभागाने जप्त केले आहे. मात्र, त्यापैकी एका जखमी सशाचा मृत्यू झाला आहे.
ससे, भोरीची शिकार करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Updated: May 4, 2017 00:15 IST