अमरावती : खेडेगावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ६१ हजार शाळांसाठी सुरु केलेल्या मूल्यांकनासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. पहिल्याच वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ वरुन १५९९ एवढी झाली असून ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या ६ हजार २४८ वरुन १४ हजार ९१८ पर्यंत वाढ झाली आहे.ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६०२ सहीत राज्यातील ६० हजारांहून अधिक शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय २०१२-१३ मध्ये घेतला. त्यासाठी शाळात भौतिक आणि शैक्षणिक सुविधा आहेत का, शाळेच्या खोल्या स्वच्छता गृहांची स्थिती, शाळेला मैदान आहे की नाही, शिक्षकांचे परीक्षण गावकऱ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची उपस्थिती यांवर शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये मुल्यांकन करण्यात आले. शाळांना अ, ब, क, ड, ई अशा प्रकारच्या श्रेणी देण्यात आल्या.या श्रेणीनुसार पहिल्या वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ होती ती दुसऱ्या वर्षी १ हजार ५९९ वर पोहचली. ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या पहिल्या वर्षी ६ हजार २४८ वर होती, ती दुसऱ्या वर्षी १४ हजार ९१८ वर पोहचली आहे.एकीकडे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या वाढत असताना दुसरीकडे क, ड आणि ई वर्गातील श्रेणी घटून त्यातील बहुसंख्य शाळा ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात समाविष्ट होवू लागल्या आहेत. पहिल्या वर्षी ‘क’ वर्गातील शाळांची संख्या ४५ हजार १०१ एवढी होती. दुसऱ्या वर्षी ही संख्या ४० हजार ७०८ ने घटली आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली
By admin | Updated: July 16, 2014 23:51 IST