मनीष कहाते - अमरावतीसन २०१५-१६ यावर्षीसाठी राज्याच्या शिक्षण विभागाने स्वयंअर्थसहायीत नवीन इंग्रजी शाळांच्या प्रस्तावाची मागणी केली होती. त्यानुसार खासगी शिक्षण संस्था चालकांनी सुमारे ५५०० इंग्रजी शाळांचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. सध्या हे संपूर्ण प्रस्ताव पुणे येथील शिक्षण संचालकांकडे पुढील कारवाई करीता आले आहेत.शिक्षण विभागाने नवीन इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी जागा आणि संस्थेच्या नावाने मुदत ठेव, अशा दोन महत्वाच्या अटी घातल्या होत्या. परंतु उपरोक्त दोन अटी राज्यभरातील अनेक शिक्षण संस्थांनी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश प्रस्ताव अपात्र ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे अपात्र नवीन इंग्रजी शाळांना त्यांची पात्रता सिध्द करण्यासाठी तीन वेळा संधी दिली जाणार आहे. नवीन इंग्रजी शाळांचे स्वयंअर्थसहायीत प्रस्ताव प्रथम आॅनलाईन भरायचे होते. त्यानंतर संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे हे प्रस्ताव आले. त्यांनी संपूर्ण प्रस्तावाची तपासणी करून पात्र आणि अपात्र प्रस्तावांची यादी आणि अहवाल शिक्षण उपसंचालकांकडे पाठविला. उपसंचालकांनी संपूर्ण प्रस्ताव अहवालासह शिक्षण संचालक पुणे यांचेकडे पाठविला आहे. असे एकूण ५५०० च्या जवळपास प्रस्ताव आलेले आहेत. या संपूर्ण प्रस्तावांची तपासणी करून मंत्रालयाच्या शिक्षण विभागात येत्या महिनाभरात पुढील कारवाईकरिता पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर संस्था पात्र सिध्द झाल्यास संंस्था चालकाला प्रथम हेतूपत्र देण्यात येईल. शाळेच्या बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष शाळेला सुरूवात करण्यात येणार आहे.
नवीन इंग्रजी शाळांचे प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे
By admin | Updated: December 9, 2014 22:43 IST