फोटो पी ०१ कांडलकर
बाहेरच्या पानासाठी
मोर्शी : बरोबर चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी तिला नवरी म्हणून हळद लागली, अगदी त्याच दिवशी तिने घेतलेली अकाली एक्झिट समाजमनाला हुरहुर लावून गेली. जिवापल्याड प्रेम असणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या स्पंदनला मागे ठेवून ती दिगंताच्या प्रवासाला निघून गेली. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथे हा हृदयद्रावक प्रसंग घडला. ३० जानेवारी रोजी यामिनी कांडलकर यांची अवघ्या ३१ व्या वर्षी प्राणज्योत निमाली. मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी यामिनी भरल्या संसारातून निघून गेली.
१ फेब्रुवारी २०१७ रोजी वरूड येथील यामिनी मारोतराव तरार हिचा विवाह गुरुकुंज मोझरी येथील अमित कांडलकर यांच्याशी झाला. त्यांच्या संसारवेलीवर ‘स्पंदन’ नामक फूलही बहरले. सारे काही सुरळीत सुरू असताना यामिनीला किडनीच्या आजाराने ग्रासले अन् सुरू झाला डायलिसीस व दवाखान्याच्या येरझारा. एक दीड वर्षांच्या काळात यामिनीची प्रकृती ‘कधी तोळा कधी मासा’ अशी राहिली. बघता बघता कन्या स्पंदन तीन वर्षांचीदेखील झाली. यामिनीचा औषधोपचार सांभाळून अमितने मुलगी व कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मात्र, अशातच ३० जानेवारी रोजी पहाटे यामिनीचा श्वास थांबला. गुरुकुंज मोझरी येथील राहत्या घरी तिचे निधन झाले. आईच्या मृत्यूची यत्किंचितही कल्पना नसलेली स्पंदन खेळत होती. मात्र, तिचे अबोध लीलांनी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. चार वर्षांपूर्वी जिला लग्नाची हळद लावली गेली, त्याच दिवशी चार वर्षांनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंतिमत: सवाष्ण स्त्रीचा साज चढविण्यात आला. हळदीकुंकवाने औक्षण करण्यात आले. मात्र, ते औक्षण कांडलकर व तरार कुटुंबीयांसाठी मोठे हृदयद्रावक ठरले.
---------------