मोर्शी : तालुक्यातील येरला या छोट्याशा गावातील गरीब शेतकऱ्याची पदवीधर मुलगी पूनम बाळसराफ हिने विदर्भातील पहिली डॉग ट्रेनर महिला होण्याचा मान पटकावला.
घरातील अत्यंत गरीब परिस्थितीत आई-वडिलांना आर्थिक साहाय्य व्हावे, या उद्देशाने पूनमने मोर्शी येथील वैद्य ट्रेनिंग सेंटरमध्ये मोलमजुरी करायला सुरुवात केली. श्वानांचे प्रशिक्षण पाहत असताना, भविष्यात आपणालासुद्धा श्वान प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो, ही भावना तिच्यात दृढ झाली व तशी इच्छा तिने संचालक सुभेदार गणेश वैद्य यांच्याकडे व्यक्त केली. सुभेदार वैद्य यांनी तिच्यातील जिद्द, चिकाटी, धाडस व परिश्रम करण्याची तयारी हेरून होकार दिला. त्यानंतर तिने सहा महिने अत्यंत खडतर व कठीण असे डॉग प्रशिक्षण पूर्ण केले. यादरम्यान अनेकवेळा तिला विविध प्रजातीच्या श्वानांनी चावा घेतला. तरीसुद्धा न घाबरता तिने अतिशय आक्रमक अशा श्वानांना नियंत्रित करून त्यांच्याशी मैत्री केली.
पूनम ही विदर्भातील पहिली डॉग ट्रेनर महिला ठरली आहे. त्याबद्दल येरला येथील माजी पोलीस पाटील व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य नानासाहेब पाटील यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. संजय उल्हे, एनसीसी अधिकारी श्रीकांत देशमुख, उद्योजक नितीन गावंडे, प्रवीण मानकर याप्रसंगी उपस्थित होते.