‘सीसीटीएनएस’ प्रकल्प कार्यान्वित : एकूणच कामकाजाला येणार गती, पारदर्शकता अमरावती : एनसीआरबी व केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली अमरावती शहरात ‘क्राईम, क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टिम’ प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याने शहरातील सर्वच पोलीस ठाणे आता आॅनलाईन झाले आहेत. या प्रकल्पामुळे पोलीस विभागाचे कामकाज पेपरलेस होणार आहे. पुणे येथील गुन्हे अन्वेषण केंद्राचे अप्पर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अमरावती पोलीस आयुक्तालयाची राज्यात तिसऱ्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. ३० जुलैपासून ‘सीसीटीएनएस’ प्रकल्प पहिल्यांदा राजापेठ, कोतवाली, फे्रजरपुरा, नांदगाव पेठ, नागपूरी गेट येथे सुरुकरण्यात आला. दुसऱ्या टप्यात ३१ जुलै रोजी खोलापुरी गेट, भातकुली, वलगाव, गाडगेनगर, बडनेरा पोलीस ठाण्यांत हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता पुणे येथील गुन्हे अन्वेषण केंद्राचे पोलीस उपअधीक्षक गावडे व एका खासगी कंपनीचे अमुल तुमडे, तांत्रिक अभियंता अमित देशमुख यांचे सहकार्य अमरावती पोलीस विभागाला लाभले आहे. असे आहे ‘सीसीटीएनएस’ प्रकल्पाचे कार्य’सीसीटीएनएस’ प्रकल्पात पोलीस ठाण्याचे दैनंदिन कामकाज, प्रथम खबर अहवाल (एफआयआर), हरविलेल्या व्यक्ति, न्याय वैद्यकीय प्रकरण (एमएलसी), अनोखळी मृतदेह, ओळख पटलेला मृतदेह, अदखलपात्र अहवाल (एनसी), हरविलेली मालमत्ता, अटक मेमो, तक्रारी, बेवारस सोडून दिलेली मालमत्ता, हरविलेल्या गुरांची नोंदणी, प्रतिबंधक कार्यवाही, आगीच्या घटना, जप्तीचा मेमो, सापडलेली अनोखळी व्यक्ती आदींच्या नोंदी पोलीस ठाण्यात आॅनलाईन पध्दतीने केली जाईल. ही माहिती राज्यातील पोलीस वरिष्ठ कार्यालय व पोलीस ठाण्यांना आॅनलाईन पध्दतीने दिली जाणार असून ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने इतरांना पाहता येणार आहे. पहिली आॅनलाईन तक्रार फे्रजरपुरा ठाण्यात सीसीटीएनएस प्रकल्प सुरु होताच आॅनलाईन तक्रारींच्या नोंदी पोलीस विभागाने सुरु केल्या आहेत. त्यामध्ये पहिली तक्रार फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी एफआयआर क्रमांक १ मध्ये विजय डोम्या उर्फ बबन भोसले (रा.वडाळी) यांच्या तक्रारीवरून आरोपी विनोद भोसलेविरूध्द भादंविच्या कलम ३२५, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने विजय भोसले यांच्यावर विळीने हल्ला करून जखमी केल्याची ही घटना आहे. आॅनलाईन तक्रार सीटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या आॅनलाईन तक्रारी करता येतील. हरविलेल्या व्यक्ति, वाहनांचा शोध घेता येईल.ही यंत्रणा कार्यान्वित होईल.
शहरातील पोलीस ठाण्यांचा कारभार पेपरलेस
By admin | Updated: August 2, 2015 00:31 IST