खासगी क्षेत्रात नोंदवही : दर दोन तासांनी आढावाअमरावती : धुळे येथे निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांनी तीव्र निषेध नोंदविला. त्या पार्श्वभूमिवर पोलीस विभागाकडून शहरातील डॉक्टरांना सरंक्षण पुरविण्यात आली. रुग्णालयात पोलीस सज्ज करण्यात आले असून खासगी रुग्णालयात नोंदवही ठेवून दर दोन तासांनी पोलीस रुग्णालयाला भेट देऊन नोंदवहीत नोंद करीत आहेत. वरिष्ठ स्तरावरील आदेशाने शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील रुग्णालयात डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या चारही रुग्णालयांत पोलीस तैनात करण्यात आले आहे. इर्विन व डफरीन रुग्णालयात प्रत्येकी एक पोलीस हवालदार व चार शिपाई तैनात करण्यात आले असून सुपर स्पेशालीटी व पीडीएमसीत प्रत्येकी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. दिवस व रात्रपाळीत हे कर्मचारी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील प्रत्येक रुग्णालयात पोलीस विभागाकडून एक नोंदवही ठेवण्यात आली आहे. दर दोन तासांनी सीआर, दामीनी पथक, मार्शल व्हॅन, पोलीस अधिकारी संबधीत रुग्णालयाला भेट देऊन सुरक्षेसंबधीत आढावा घेत आहे. या भेटीची नोंदवहीवर नोंद करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात
By admin | Updated: March 29, 2017 00:25 IST