सकारात्मक दृष्टीने विविध अडचणींवर मात शक्य, शैलेश नवाल यांचा सहकाऱ्यांशी संवाद
अमरावती : नागरिकांच्या जीवनात चांगले बदल घडवून आणण्याची संधी प्रशासनात काम करणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांना मिळत असते. त्याची जाणीव ठेवून सर्वांनी सकारात्मक दृष्टी अंगीकारून काम केल्यास अनेक अडचणींवर मात करता येते व कामे यशस्वी होतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
शैलेश नवाल यांच्या स्थानांतराच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रम नियोजन भवनात झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह विविध उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना संकटकाळात अमरावतीकरांनी दाखवलेला खंबीरपणा, प्रशासनाला दिलेली साथ यामुळे अनेक अडचणींवर मात करता आली. सर्वांच्या सहकार्यानेच अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागू शकली. सुस्पष्ट परस्पर संवादाने अनेक कठीण प्रश्नांवर तोडगा निघू शकतो व पुढे जाता येते, याचा अनुभव मिळाला, असे ते म्हणाले. त्यांनी ‘स्टे फिट’चा सल्ला सहकाऱ्यांना दिला. याप्रसंगी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार माया माने यांनी भावना व्यक्त केल्या.