अमरावती : गणरायाच्या आगमनाला उणेपुरे १५ दिवस शिल्लक असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी चालविली आहे. गणेश मंडळांना परवानगी घेणे सुकर व्हावे, यासाठी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाचही झोन कार्यालयात सोय केली आहे. आता महापालिका मुख्य कार्यालयात न येता मंडळांना नजीकच्या झोन कार्यालयातूनच परवानगी मिळणार आहे.उच्च न्यायालयाच्या १३ मार्च २०१५ व २४ जून २०१५ रोजीच्या आदेशान्वये सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र तसेच सर्व धार्मिक सण उत्सव साजरे करताना मंडप, बुथ उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. या धोरणाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने परवनागी देण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. १७ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत पारित ठरावाच्या अनुषंगाने गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. अटी-शर्तींच्या अधीन राहून गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली जाणार आहे. बुथ, मंडप उभारणीची परवानगी देण्यापूर्वी स्थळदर्शक नकाशा व इतर आवश्यक कागदपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. रहदारीला अडथळा होणाऱ्या जागेवर परवानगी दिली जाणार नाही. ३० दिवस अगोदर परवानगीसाठी अर्ज सादर करावा लागेल. गणेश मंडळांना परवानगी देणे सुकर व्हावे,यासाठी सहायक आयुक्तांच्या दिमतीला अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर अभियंत्यांना या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची परवानगी प्रक्रिया सुकर झाली आहे.
गणेशोत्सव मंडळांना महापालिका झोन कार्यालयांतून मिळणार परवानगी
By admin | Updated: September 4, 2015 00:29 IST