अधिकाऱ्यांची धावपळ : एमसीआयचे अधिकारी दाखलअमरावती : दिल्ली येथील मेडिकल काऊंसिल आॅफ इंडियाकडून सोमवारी डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी करण्यात आली. एमसीआयचे अधिकारी दाखल होताच पीडिएमसीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ होताना दिसून आली. पीडिएमसी प्रशासन मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असून काही महिन्यांत सीबीआय चौकशी, आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून चौकशी, कालबाह्य औषधींचे प्रकरण, गुणवाढ प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्यातच सोमवारी एमसीआयचे अधिकारी अचानक दाखल झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची ताराबंळ उडाली होती. एमसीआयकडून दर पाच वर्षांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची नियमित तपासणी केली असते. त्याच अनुषंगाने सोमवारी अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू करून पीडिएमसीतील विविध विभाग, महाविद्यालयातील विभाग व रुग्णालयीन व्यवस्थापनाचा आढावा घेतला. एमसीआय अधिकाऱ्यांकडून इन कॅमेरा ही तपासणी करण्यात आली असून प्रत्येक विभागाची तपासणी करून नोंदी करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एमसीआयच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नियमित चौकशीचा भाग असल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला. मात्र, एमसीआयचे अधिकारी तपासणी करीत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची ताराबंळ उडाल्याचे चित्र पीडिएमसीत होते. (प्रतिनिधी)एमसीआयकडून दर पाच वर्षांनी पीडिएमसीतील विविध विभागांची नियमित तपासणी केली जाते. एमसीआयचे अधिकारी अचानक येतात व तपासणी सुरु करतात. त्यामुळे त्यांच्या तपासणीबाबत काही माहिती सांगता येणार नाही. - दिलीप जाणे, अधिष्ठाता, पीडिएमसी.
एमसीआयकडून पीडीएमसीची तपासणी
By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST