लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा (अमरावती): राज्यातील कंत्राटदारांची ९० हजार कोटींची देयके प्रलंबित असून, त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन कंत्राटदार मंगळवारी धरणे देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉट मिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्थांद्वारा हे आंदोलन केले जाणार आहे. याकरिता १९ ऑगस्टला सकाळी १०:३० कंत्राटदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमणार आहेत. ३५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे धरणे आंदोलन होत आहे.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, इतर अनेक विभागांतील कंत्राटदारांची जवळपास ९० हजार कोटी रुपयांची देयके गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. यामुळे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, अभियंता, मजूर संस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत. अमरावती विभागातील कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर १९ ऑगस्टला सकाळी १०:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचे संघटनेच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे दिल्या गेलेल्या पत्रात नमूद आहे.