लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई या फेरीच्या वेळापत्रकात एअर अलायन्स विमानसेवा कंपनीने २७ ऑक्टोबरपासून बदल होण्याचे संकेत आहेत. वेळापत्रकात बदलाची मागणी गत काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रवाशांची होती. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस अमरावती-मुंबई-अमरावती फेऱ्या चालणार आहे.
केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत अमरावती ते मुंबई अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी ही विमानसेवा आहे. बेलोरा विमानतळाहून १६ एप्रिल २०२५ रोजी अलायन्स एअरचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावले होते. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे २१ ऑगस्ट २०२५ पासून अमरावती-मुंबई अलायन्स एअरची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती युद्धस्तरावर करण्यात आली. 'ऑपरेशन इश्यू'च्या नावाखाली विमानसेवा तूर्तास थांबली होती. आता अलायन्स एअरने विमानाच्या फेऱ्यांचे शेड्यूल्ड जाहीर केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून मुंबई ते अमरावती विमानफेरी सुरू नियमित सुरू झाली आहे. २७ ऑक्टोबर रोजी मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे प्रवास भाडे ३१५० रुपये दर्शवित आहेत.
एटीआर-७२ विमानाची यशस्वी चाचणी
३० मार्च २०२५ रोजी अमरावती विमानतळावर एटीआर-७२ विमानाने यशस्वी चाचणी केली. विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदूरहून अमरावतीला आले, हे विशेष.
तिसरे व्यावसायिक विमानतळ
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले. विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. अमरावती विमानतळाहून हल्ली अलायन्स एअरची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू आहे.
असे असेल नवे वेळापत्रक
मुंबई ते अमरावती सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ होईल. अमरावती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी लैंडिंग होईल. अमरावती ते मुंबई सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी टेकऑफ होईल. मुंबई विमानतळावर सकाळी ११ वाजता लँडिंग होणार आहे.
"अमरावतीत विमान सेवा सुरु झाली होती. परंतु त्याची वेळ ही अमरावतीकरांच्या सोयीची नव्हती. त्याअनुषंगाने २१ जुलैला उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन वेळेत बदल आणि तिकिटीचे दर कमी करण्याची मागणी केली होती. या दोन्ही मागण्या अखेर मान्य झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा प्रवास करणे आता अधिक सोयीचे होणार आहे."- बळवंत वानखडे, खासदार
"प्रवाशांच्या मागणीनुसार अमरावतीच्या विमान सेवेच्या वेळेतील बदलाची मागणी केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. आता सकाळी अमरावतीकरांना मुंबईत वेळेत पोहचता येणार आहे."- नवनीत रवी राणा, भाजप नेत्या
"अमरावती विमान सेवेचा पूर्वीची वेळ ही सोयीची नव्हती. मुंबईत पोहचायला रात्र व्हायची. त्यामुळे वेळेत बदल होण्याची मागणी होती. अलायन्स कंपनीने विमान सेवच्या वेळेत बदल करुन तो सकाळचा केल्याने नक्कीच अमरावतीकरांना फायदा होईल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा वेळ बदलायला नको याची काळजी घेतली पाहिजे."- डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री
"अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदलाच्या हालचाली वेगाने सुरू आहे. अलायन्स एअरकडून अधिकृत आठवड्यातून वेळापत्रकानंतर चार फेऱ्या सुरू होतील."- राजकुमार पटेल, प्रबंधक अमरावती विमानतळ