पोलिसांकडे तक्रार : निवृत्त कर्मचाऱ्याला ६६ हजारांनी लुटले
वरुड : खुपिया पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी वरूड शहरात हैदोस घातला आहे. येथील एका स्थानिकाला थांबवून त्यांची झडती घ्यायची आहे, अशी बतावणी करून त्यांच्या गळ्यातील एक सोन्याचा गोफ रुमालामध्ये बांधून रफुचक्कर झाला. यासंदर्भात वरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.
तक्रारीनुसार, येथील पोस्ट ऑफिजवळ राहणारे निवृत्त कर्मचारी अरुण लक्ष्मणराव तडस (६१) हे नगर परिषदजवळून पायी निघाले होते. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास ते टपाल कार्यालयाजवळील गुणवंत मेडिकलसमोरून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबविले. एका दुकानात एका व्यक्तीला चाकू मारण्यात आला आहे. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. मी खुपिया पोलीस अधिकारी असल्याने मला तुमची झडती घ्यायची आहे, अशी बतावणी त्या अनोळखी व्यक्तीने तडस यांच्याकडे केली. गांजा वगैरे आहे का, अशी विचारणा केली. तडस यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून मोबाईल, पैशाचे पाकीट, वीडी काढली. डायरी, पेन, चष्मा अशा साऱ्या वस्तू रूमालात टाकायला सांगितल्या. तो अनोळखी इसम त्यावरच न थांबता त्याने तडस यांच्या गळ्यातील २० ग्रॅमचा सोन्याचा गोफ व ओमचे लॉकेट स्वत: काढले. तडस यांच्या बोटातील १० ग्रॅमची अंगठी अशा सर्व वस्तू त्याने रुमालात बांधून दिल्या. रुमालात बांधलेल्या वस्तू तडस यांच्या खिशात टाकून व्यवस्थित घरी जाण्यास बजावले. त्यामुळे तडस नगर परिषदेजवळ आले. रुमालातील वस्तूंची चाचपणी केली. तेव्हा मात्र २० ग्रॅमचा गोफ व २ ग्रॅमचे लॉकेट दिसले नाही. सबब, आपली फसवणूक झाल्याचे तडस यांच्या लक्षात आले. याप्रकरणी रात्री ८ च्या सुमारास वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम १७०, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
अन्य एका व्यक्तीचीही झडती
अरुण तडस यांच्या तक्रारीनुसार, त्या अनोळखी इसमाने त्यांच्यापुर्वी अन्य एका इसमाची झडती घेतली. त्या व्यक्तीकडील सर्व साहित्य एका रुमालात बांधून ते बॅगमध्ये टाकून त्याला जाण्यास सांगितले. तो अज्ञात तोतया ५.९ फूट उंचीचा, मजबूत बांध्याचा होता तसेच त्याने काळ्या रंगाचे शर्ट घातले असल्याचे वर्णन तडस यांनी सांगितले आहे.
कोट
वरूड शहरात खुपिया पोलीस असल्याची बतावणी करून लोकांना झडती घेतली जात आहे. मौल्यवान वस्तू घेऊन ते तोतया पोबारा करीत आहेत. अशा प्रकारची घटना घडल्यास सर्वप्रथम सदर व्यक्तीस त्याचे ओळखपत्र, नाव विचारावे. पोलीस ठाणे वरूड येथे ०७२२९-२३२००८ या क्रमांकावर संपर्क साधावा. सतर्क राहावे.
प्रदीप चौगावकर, ठाणेदार, वरूड
--------------